काश्मीरमध्ये जिहादी संघटनेच्या संस्थेकडून चालवण्यात येणार्‍या ३२३ शाळा बंद करण्याचा आदेश

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीर प्रशासनाने बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना ‘जमात-ए-इस्लामी’शी संबंधित असलेल्या ‘फलाह-ए-आम ट्रस्ट’कडून चालवण्यात येणार्‍या सर्व शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे. येत्या १५ दिवसांत या शाळा प्रशासनाकडून सील करण्यात येणार आहेत. या सर्व शाळांमधील ११ सहस्र विद्यार्थ्यांना जवळच्या सरकारी शाळांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. प्रशासनाने सांगितले की, या संस्थेकडून चालवण्यात येणार्‍या शाळांची नोंदणी सरकारकडे करण्यात आली नव्हती.

‘फलाह-ए-आम’ या संस्थेची वर्ष १९७२ मध्ये जमातकडून स्थापना करण्यात आली होती. या संस्थेकडून संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये ३२३ शाळा चालवण्यात येत होत्या. वर्ष १९९० मध्ये तत्कालीन राज्यपाल जगमोहन यांनी ‘जमात-ए-इस्लामी’वर बंदी घातल्यानंतर या शाळाही बंद करण्यात आल्या होत्या. नंतर त्या पुन्हा चालू झाल्या होत्या.