विकासाच्या नावाखाली तीर्थक्षेत्रांना पर्यटनस्थळे बनवू नका !

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनातील प्रथम ‘हिंदु राष्ट्र संसदे’ची आग्रही मागणी !

रामनाथी, १४ जून (वार्ता.) – प्राचीन काळी अंकोर वाट, हम्पी, आदी भव्य मंदिरे उभी करणार्‍या राजे-महाराजांनी त्यांचे उत्तम व्यवस्थापन केले होते. या मंदिरांच्या माध्यमातून गोशाळा, अन्नछत्र, धर्मशाळा, शिक्षणकेंद्र चालवून समाजाला मोलाचे साहाय्य केले जात होते. यामुळेच मंदिरांशी हिंदु समाज जोडलेला असे. आता मात्र मंदिरांचे इतके व्यापारीकरण झाले आहे की, ती व्यापारी संकुले (शॉपिंग मॉल) होऊ लागली आहेत, तसेच तीर्थक्षेत्रांना विकासाच्या नावे पर्यटनस्थळ बनवले जात आहे. हे रोखणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिरांच्या विश्वस्तांनी, तसेच पुरोहितांनी मंदिरांचे आदर्श व्यवस्थापन केले पाहिजे. हे साध्य करण्यासाठी ‘मंदिरांचे आदर्श व्यवस्थापन’ (दी टेम्पल मॅनेजमेंट) हा अभ्यासक्रम चालू करावा, याविषयी ‘हिंदु राष्ट्र संसदे’त विचारमंथन करण्यात आले. १३ जूनला दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या द्वितीय दिनी ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’ या विषयावरील हिंदु राष्ट्र संसदेत विविध मंदिरांचे विश्वस्त, भाविक, अधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले. अन्य मान्यवरांनी विचारमंथन केले. या संसदेत सभापती म्हणून भुवनेश्वर (ओडिशा) येथील ‘भारत रक्षा मंच’चे राष्ट्रीय महामंत्री अनिल धीर, उपसभापती ‘हिंदु जनजागृती समिती’चे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ आणि सचिव म्हणून ‘हिंदु जनजागृती समिती’चे मध्यप्रदेश तथा राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी कामकाज पाहिले.

काय आहे हिंदु राष्ट्र संसद ?

ज्याप्रमाणे जनहित आणि राष्ट्रहित यांविषयी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींची संसद अस्तित्वात आहे. त्याप्रमाणेच धर्महिताच्या विषयावर चर्चा करण्यासाठी धर्मप्रतिनिधींची ही हिंदु राष्ट्र संसद आहे. या संसदेत संमत होणारे प्रस्ताव भारतीय लोकप्रतिनिधींना पाठवण्यात येणार आहेत. त्या आधारे संसदेत या विषयावर चर्चा होऊ शकेल. तात्पर्य ही संसद केवळ प्रतिकात्मक आहे. या संसदेद्वारे सुचवण्यात आलेल्या प्रस्तावांवर भविष्यात भारतीय संसदेत चर्चा होऊ शकेल.

१. हिंदु राष्ट्र संसदेची आचारसंहिता !

या संसदेत सहभागी होण्यासाठी आवश्यक शिष्टाचार आणि नियम पुढीलप्रमाणे आहेत.

अ. या संसदेत सहभागी होणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना ‘सदस्य’ म्हटले जाईल.

आ. संसदेचे कामकाज निश्चित करण्यासाठी आणि सदस्यांकडून आचारसंहितेचे पालन व्हावे, यासाठी ३ सदस्यांचे एक सभापती मंडळ स्थापन करण्यात आले आहे. संसदेचे संचालन करण्याचे दायित्व संचालक मंडळाचे असेल. ‘संसदेत कोण विषय मांडणार ?’, ‘त्यासाठी किती वेळ असेल ?’, याचा निर्णय संभापती मंडळ करेल.

इ. ज्या सदस्यांना संसदेत विषय मांडायचा आहे, त्यांनी विषय आणि त्याची आवश्यकता हे चिठ्ठीवर लिहून सभापती मंडळाला स्वीकृत करण्यासाठी अधिवेशन समन्वय कक्षाकडे द्यावे. सभापतींच्या अनुमतीनंतर व्यासपिठापुढील राखीव आसनावर बसून सभापतींच्या अनुमतीने सदस्याला संसदेत विषय मांडता येईल.

ई. सदस्याने सभापतींनी दिलेल्या वेळेत स्वत:चा विषय पूर्ण करणे आवश्यक आहे. वेळेची मर्यादा संपल्यावर संसदीय सचिव सदस्याला सूचित करण्यासाठी घंटी वाजवेल. त्यानंतरही सदस्य विषय मांडत राहिला, तर ते सभेच्या मर्यादेचे उल्लंघन मानले जाईल. विशेष परिस्थितीत सदस्याला विषय मांडण्यासाठी अधिक वेळ देण्याचा निर्णय सभापती मंडळ घेऊ शकतील.

उ. कोणत्या सदस्याला संसदेत मांडण्यात आलेल्या विचारांचे खंडन करायचे असेल, तर त्याविषयी सभापती मंडळाकडे निवेदन करून अनुमती घ्यावी लागेल.

ऊ. संसदेत विषय मांडतांना अपशब्द, असंसदीय शब्दांचा वापर कुणीही करू नये. असे करणे हे सभेच्या मर्यादांचे उल्लंघन समजले जाईल. असे भाषण सभेच्या कामकाजातून काढून टाकण्याचा अधिकार सभापती मंडळाला राहिल.

ए. सदस्याला संसदेत विषय मांडतांना व्यासपिठाच्या समोर बसलेल्या आसनावरून उठून त्यांना विषय मांडता येईल.

२. सभापती मंडळाचे स्वरूप : सभापती मंडळामध्ये सभापती, उपसभापती आणि सचिव यांचा समावेश असेल.

३. विशेष संसदीय समिती : विशेष संसदीय समिती (पार्लमेंटरी एक्स्पर्ट कमिटी) माननीय सदस्यांद्वारे उपस्थित करण्यात आलेल्या सूत्रांवर आवश्यकतेनुसार सुधारणा किंवा त्यांचे खंडन करेल. त्यासाठी या समितीचे सदस्य त्यांच्या स्थानावरून उठून सभापतींच्या अनुमतीने विषय मांडतील. अन्य सदस्यांना अशा प्रकारे अनुमती मागता येणार नाही. अन्य सदस्यांना त्यांची सूत्रे लिहून देणे बंधनकारक आहे.

१. समाजात नीतीमत्ता येण्यासाठी मंदिरांची आवश्यकता आहे ! – (सुश्री) रामप्रियाश्री (माई) अवघड, अध्यक्षा, ‘रामप्रिया फाऊंडेशन’, अमरावती

(सुश्री) रामप्रियाश्री (माई) अवघड

हिंदू समाज शरीराने हिंदू असूनही त्यांची बुद्धी मात्र इंग्रजांची झाली आहे. मंदिरे ही आपली श्रद्धा आणि प्रेरणा यांची केंद्रे आहेत; मात्र याच श्रद्धांवर आघात करून ५ लाखांहून अधिक मंदिरांचे भंजन करण्यात आले. आता तरी मंदिरांचे रक्षण करण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ही व्यवस्था हिंदु जनजागृती समिती करत आहे. आपल्या देशात जागोजागी मंदिरे आहेत. ही मंदिरे सद्विचारांची प्रेरणा देतात.  ज्या ठिकाणी मंदिरे असतात, तेथील परिसरात चैतन्य निर्माण होते. मंदिरातील देवतांची प्रतिदिन उपासना करता करता भाविकांमधीलही देवत्व जागृत होते. त्यासाठी मंदिरांमध्ये येणार्‍या हिंदू भाविकांचे एकत्रीकरण करून त्यांना धर्मशास्त्र शिकवले गेले पाहिजे. विशेषत्वाने लहान मुले आणि तरुण यांना मंदिरांशी जोडण्याची आवश्यकता आहे. लोकांमध्ये नितिमत्ता येण्यासाठी मंदिरांची आवश्यकता आहे.

केवळ रामनामाचा नामजप करून उपयोगाचे नाही, रामकार्यात योगदान दिल्यास भक्ती यशस्वी होते. योगदान न दिल्यास भक्ती यशस्वी होत नाही. संतांनी सांगितल्याप्रमाणे वर्ष २०२५ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे; मात्र त्या कार्यात आपण सर्वांनी योगदान देणे आवश्यक आहे.’’

२. मंदिरांमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याला नव्हे, तर धर्माचरणालाच महत्त्व असल्याने वस्त्रसंहिता लागू करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

सद्गुरु नंदकुमार जाधव

‘‘सध्या हिंदु धर्म न मानणारे किंवा देवतेवर श्रद्धा नसलेले आधुनिकतावादीच मंदिरांतील वस्त्रसंहितेला व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली विरोध करत असतात. मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, याला आम्ही ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ म्हणणार नाही. प्रत्येकाला ‘आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत’, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिकस्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. येथे व्यक्तीस्वातंत्र्याला नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे’’, असे मार्गदर्शन सनातनचे संत सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले. ‘हिंदु राष्ट्र संसदे’तील ‘मंदिर व्यवस्थापन’ या चर्चेमध्ये मी ‘मंदिरांमध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू करावी !’ याविषयावर मार्गदर्शन करत होते.

सद्गुरु नंदकुमार जाधव पुढे म्हणाले की,

१. तमिळनाडू उच्च न्यायालयानेही ‘तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे’, हे मान्य करून १ जानेवारी २०१६ पासून वस्त्रसंहिता लागू केली आहे. त्यानुसार भाविकांनी केवळ भारतीय पारंपरिक वस्त्रे परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

२. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, महाराष्ट्रातील श्री घृष्णेश्वर मंदिर, वाराणसीचे श्री काशी-विश्वेश्वर मंदिर, आंध्रप्रदेशचे श्री तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे विख्यात श्री पद्मानाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे श्री माता मंदिर अशा काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांसाठी सात्त्विक वस्त्रसंहिता लागू झाली आहे.

३. भारतातील सर्वच मंदिरांनी अशा प्रकारे वस्त्रसंहिता लागू करून मंदिरांमध्ये धर्माचरणाला प्राधान्य द्यावे, असे आम्ही आवाहन करतो.

सरकार मंदिरांकडे धनप्राप्तीचे साधन म्हणून पहात आहे ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

पू. नीलेश सिंगबाळ

मंदिरे ही चैतन्याचा स्रोत असल्यामुळे देश-विदेश येथील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविक जातात. आक्रमकांनी सहस्रावधी मंदिरे उद्ध्वस्त केली आहेत. या मंदिरांच्या पुनर्उभारणीसाठी हिंदू आजही संघर्ष करत आहेत. दुसर्‍या बाजूला मात्र धर्मनिरपेक्ष सरकारे मंदिरांचे अधिग्रहण करत आहेत. मंदिरांच्या निर्मितीसाठी कोणतेही योगदान नसतांना सरकार मंदिरांकडे धनप्राप्तीचे साधन म्हणून पहात आहे. देवनिधीचा दुरुपयोग केला जात आहे. अनेक मंदिर समितींच्या विरोधात न्यायालयात खटले चालू आहेत. हिंदू मंदिरांमध्ये करण्यात आलेल्या दानाचा उचित विनियोग होणे, हेही महत्त्वाचे आहे. यासाठी मंदिरांचे सुनियोजन होणे आवश्यक आहे.

मंदिर केवळ धनवान लोकांसाठी नाही, तर सामान्यांसाठीही आहे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

रमेश शिंदे

‘‘हिंदु धर्म आणि मंदिरे यांचा संबंध प्राचीन आहे. धर्माच्या रक्षणामध्ये मंदिरांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे मंदिरांचे सुनियोजन असले पाहिजे. मंदिर केवळ धनवान लोकांसाठी नाही, तर सामान्यांसाठीही आहे. त्यामुळे मंदिरांमध्ये व्यवस्था करतांना सर्वसामान्यांचा विचार व्हायला हवा’’, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले की,
१. आधुनिक मंदिरांमधील लाद्या ‘मार्बल’ किंवा ‘ग्रॅनाईट’च्या असल्याने उन्हात भाविकांच्या पायांना त्रास होतो. यावर उपाय म्हणून गुरुद्वाराच्या मार्गात पाण्याची व्यवस्था असते, त्याप्रमाणे मंदिरांच्या ठिकाणी व्यवस्था करू शकतो का ? मंदिर परिसरात गारवा टिकून रहाण्यासाठी मंदिराच्या परिसरात वृक्षांची लागवडही करता येईल.

२. मंदिरात येणार्‍या अर्पणाचा विनियोग करण्याची व्यवस्था पारदर्शक हवी. मंदिरातील धनाचा उपयोग धर्मप्रचारासाठी व्हायला हवा.

३. मंदिरांद्वारे वेदपाठशाळा चालवल्या जाव्यात. मंदिरांमध्ये ग्रंथालय असायला हवे. त्याद्वारे मंदिराचा इतिहास, तसेच आपल्या संस्कृतीची माहिती द्यायला हवी.

४. काही मंदिरांमध्ये दर्शनासाठी शुल्क आकारले जाते. धनाच्या आधारे नव्हे, तर भाव असलेल्यांना देवतेचे दर्शन मिळायला हवे.

स्वत:चा कारभार व्यवस्थित न करणारे सरकार मंदिरांचा कारभार काय पहाणार ? – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

आज मंदिरांच्या संरक्षणासाठी हिंदूंचा दबावगट निर्माण करणे आवश्यक आहे. मंदिरांतील धन हिंदूंसाठी वापरले जायला हवे; पण तसे न होता अनेक ठिकाणी मंदिरांतील धन सामाजिक कार्यासाठी वापरले जाते. शिर्डी देवस्थानने ५०० कोटी रुपये इतका निधी एका धरणाच्या कामासाठी दिला. प्रत्यक्षात हा निधी शेतकर्‍यांसाठी न देता त्या भागातील एका राजकीय नेत्याच्या राजकीय लाभासाठी दिला होता. खासगी क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी कामात कुचराई केल्यास शिक्षापद्धत अवलंबली जाते; मग मंदिरांच्या व्यवस्थापनात कुचराई केली, तर दुप्पट शिक्षा व्हायला हवी. सरकार स्वत:चा कारभार व्यवस्थित करत नाही, तर मंदिरांचे व्यवस्थापन कसे पहाणार ? सरकारची ही अकार्यक्षमता आपणाला सातत्याने दाखवून द्यायला हवी.

मंदिरांचे आदर्श व्यवस्थापन कसे असावे, हे दाखवून द्यायला हवे ! – अनिल धीर, राष्ट्रीय महामंत्री, भारत रक्षा मंच, भुवनेश्वर, ओडिशा.

अनिल धीर

अनेक मंदिरांच्या ठिकाणी मॉल होत आहेत. हे मॉल पर्यटकांसाठी होत आहेत. मंदिरे ही पर्यटनाची जागा नाही, तर ती धार्मिक केंद्रे आहेत. पर्यटक तोकड्या कपड्यांमध्ये मंदिरांमध्ये प्रवेश करतात. मंदिरांसाठी वस्त्रसंहिता (ड्रेसकोड) निश्चित केली पाहिजे. काही मंदिरांचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करण्यात येते. मंदिरांचे आदर्श व्यवस्थापन कसे असावे, हे हिंदूंनी जगाला दाखवून द्यायला हवे.

अन्य मान्यवरांनी संसदेत सहभागी होतांना व्यक्त केलेले अनुभव !

ह.भ.प. मदन तिरमारे

१. ह.भ.प. मदन तिरमारे, गजानन महाराज सेवा समिती, अमरावती – ग्रामस्थांनी मंदिरात सामूहिक उपासना केल्याने त्याचा त्यांना त्याचा लाभ होतो, या विचाराने अनेक मंदिरांमध्ये सर्व वयोगटांतील लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. सामूहिक उपासना केल्याने गावातील लोकांमध्ये संघटितपणा निर्माण होऊन त्यांच्यात सकारात्मक पालट होत आहेत.

 श्री. सुधाकर टाक

२. श्री. सुधाकर टाक, अध्यक्ष, राष्ट्रसंत श्री संत पाचलेगावकर महाराज, मुक्तेश्वर आश्रम, नांदेड – आम्ही आमच्या आश्रमातील सर्व व्यवहार पारदर्शक ठेवतो. आश्रमात ‘जीन्स पँट’ घालून प्रवेश दिला जात नाही.

श्री. महेश डगला

३. श्री. महेश डगला, हिंदु उपाध्याय समिती, अध्यक्ष, आंध्रप्रदेश – तिरुपति बालाजी मंदिरात होणार्‍या अपहारावरून हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे की, मंदिरे सरकारीकरणाच्या जोखडातून मुक्त व्हायला हवीत.

श्री. गणेश महाजन

४. श्री. गणेश महाजन, अध्यक्ष, श्रीद्वादश ज्योर्तिलिंग आर्य वैश्य नित्यान्न सतराम ट्रस्ट, नांदेड – गेल्या ७५ वर्षांपासून माझ्या पूर्वजांनी अन्नदानाचे मोठे कार्य केले आहे. ते कार्य तसेच पुढे चालू ठेवून यापुढील माझे आयुष्य अन्नदान करण्यासाठी मी व्यतित करणार आहे.

श्री. शंकर खरेल

५. श्री. शंकर खरेल, नेपाळ – अनेक ठिकाणी मंदिरांत दर्शनासाठी पोचताच दलाली चालू झालेली असते. मंदिरे ही व्यापारी आखाडा बनत आहेत. नेपाळ येथे ३२ वर्षांपासून साम्यवाद्यांकडून हिंदूंच्या मंदिरांची भूमी हडपण्यात आली. त्यामुळे मंदिरांचे रक्षण होणे आवश्यक आहे.

स्वामी संयुक्तानंद महाराज

६. स्वामी संयुक्तानंद महाराज, भारत सेवाश्रम संघ – भारत हा मंदिरांमुळे ओळखला जाणारा देश आहे. या ठिकाणी श्रद्धेने देवतेचे पूजन केले जाते. मंदिरांमुळे व्यक्तीचा देवतेशी व्यक्तीगत संबंध जोडला जातो. सध्या मंदिरांना व्यापारी संकुलाचे स्वरूप आले आहे. ते दूर करण्यासाठी भारतातील संपूर्ण हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे.

श्री. मदन उपाध्याय

७. श्री. मदन उपाध्याय, श्रीराम शक्ती समाज रक्षण केंद्र, छत्तीसगड – मंदिरांत पगारी पुजारी नियुक्त केल्याने देवतेचे पूजन हे काम म्हणून केले जाते. त्यामुळे पुजार्‍यांनाही मंदिरांचे व्यवस्थापन शिकवायला हवे.

८. श्री. गणेशसिंह ठाकूर, सचिव, क्षत्रिय समाज रजपूत संघटना – नांदेड येथील श्री रेणुकामाता मंदिरात होणार्‍या भ्रष्टाचाराच्या विरोधात न्यायालयीन लढा दिला. त्यामुळे संबंधितांना शिक्षा झाली. आमच्या समवेत श्री रेणुकामातेचा आशीर्वाद होता. त्यामुळेच हे शक्य झाले.

९. श्री. निधीश गोयल, ‘जम्बू टॉक’ यू ट्यूब चॅनेल, जयपूर – मंदिरांचे गर्भगृह हे सूर्यप्रकाशासारखे सर्वत्र चैतन्याचे प्रक्षेपण करण्याचे कार्य करतात. मंदिरांच्या निर्मितीमागील इतिहास समजून घ्यायला हवा.

१०. डॉ. नीलेश लोणकर, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, पुणे – मंदिरात स्वच्छता आणि शांतता असावी, तसेच देवतांचे विधीवत् पूजन व्हावे. मंदिरात अहिंदू कर्मचारी नसावेत, तसेच त्यांना मंदिरांतच काम करण्याची इच्छा असल्यास त्यांनी हिंदु धर्म स्वीकारावा.

श्री. शरद कुलकर्णी

११. श्री. शरद कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी, मंगळग्रह देवस्थान, जळगाव : जळगाव (महाराष्ट्र) येथील अमळनेर येथे मंगळ भगवानाची मूर्ती आहे. हे मंदिर अतीप्राचीन आहे. मंदिरात देवतांची पूजा शास्त्रोक्तपणे होते. मंदिरातील पुजारी सोवळे नेसून पूजा करतात. त्यामुळे मंदिरात चैतन्य टिकून आहे. मंदिरात धर्माचरणाविषयी फलक लावण्यात आले आहेत.

हिंदु राष्ट्र संसदेत ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ या जयघोषात करण्यात आलेले ठराव !

अ. सरकारी नियंत्रण हटवून मंदिरे भक्तांकडे सोपवावीत.

आ. अन्य पंथियांना कोणत्याही कामासाठी मंदिरात नियुक्त करण्यात येऊ नये.

इ. मंदिरांच्या क्षेत्रात धर्मांतर, अन्य धर्माचा प्रचार, तसेच मद्य आणि मांस यांवर पूर्णतः बंदी घालावी.