रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या विविध सोहळ्यांच्या वेळी सनातनच्या ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता विष्णुपंत जाधव यांना आलेल्या अनुभूती

सनातनच्या ७४ व्या संत पू. (सौ.) संगीता विष्णुपंत जाधव यांचा ज्येष्ठ पौर्णिमा (१४.६.२०२२) या दिवशी ५३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या विविध सोहळ्यांच्या वेळी आलेल्या अनुभूती, तसेच त्यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन येथे देत आहोत.

पू. (सौ.) संगीता जाधव यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. परात्पर गुरु हौदातील कमळ पहाण्यासाठी जात असतांना विष्णुरूपात जाणवणे आणि श्री महालक्ष्मी, तसेच अन्य देवता यांचे अस्तित्व जाणवणे

कमलपिठात दीपाची पूजा झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टर हौदातील कमळ पहाण्यासाठी काही पावले पुढे जात असतांना ‘साक्षात् विष्णु चालत आहे आणि दोन्ही महालक्ष्मी मागे उभ्या आहेत, तसेच बसलेले सर्व साधक देवतेच्या रूपात असून मुकुट घातलेले आहेत’, असे जाणवत होते. काही क्षण हे सर्व दृश्य पृथ्वीवरील नसून कोणत्या तरी वेगळ्या लोकातील असल्याचे जाणवले.

२. परात्पर गुरु डॉक्टरांना पाहिल्यावर सर्व साधकांचे तोंडवळे फुलणे आणि सर्वच जीव लोहचुंबकाप्रमाणे त्यांच्याकडे आकृष्ट होत असल्याचे जाणवणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी मागे वळून साधकांकडे पाहिले, त्या वेळी ‘सर्व साधकांचे तोंडवळे कमलासमान दिसून ते फुलत आहेत’, असे जाणवले. परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्वांकडे पाहिले. त्या वेळी केवळ सभागृहातीलच नव्हे, तर सर्वत्रचे जीव परात्पर गुरु डॉक्टरांकडे लोहचुंबकासारखे आकृष्ट होत असल्याचे जाणवले. या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येकाच्या हृदयात जात आहेत’, असे जाणवले आणि भावजागृती होत होती.

३. परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना ‘श्री’ पदक देतांना प्रचंड शक्ती ब्रह्मांडात कार्यरत होत असल्याचे जाणवणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळकाकू यांना ‘श्री’ पदक दिले. त्या वेळी ते भगवान श्रीविष्णुप्रमाणे दिसत होते. त्यांचे पाऊल जमिनीवर नसून अधांतरी असल्याचे दिसत होते अन् दोन्ही देवीही तशाच दिसत होत्या. परात्पर गुरु डॉक्टर त्यांना ‘श्री’ पदक देत असतांना ‘प्रचंड मोठी शक्ती ब्रह्मांडात कार्यरत होत आहे’, असे जाणवत होते.

४. परात्पर गुरु डॉक्टरांनी दिव्याची ज्योत प्रज्वलित केल्यावर असंख्य ज्योती अनेक जिवांमध्ये प्रज्वलित होत असल्याचे जाणवणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी दोन्ही देवींच्या (श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या) हातांतील दिव्याची ज्योत प्रज्वलित केली आणि त्यानंतर देवींनी साधिकांच्या हातात असलेल्या दिव्यांच्या ज्योती प्रज्वलित केल्या. त्या वेळी ‘असंख्य ज्योती अनेक जिवांमध्ये प्रज्वलित होत आहेत’, असे जाणवले.

५. गुरुपादुका स्थापन सोहळा झाल्यापासून ‘गुरुदेव पादुका धारण करून बसले असून महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ त्यांच्या चरणांची पूजा करत आहेत’, असे दृश्य दिसणे

यापूर्वी ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्या हृदयामध्ये असून त्यांच्या चरणांवर मी नतमस्तक झाले आहे’, असे दृश्य दिसायचे; परंतु गुरुपादुका स्थापन सोहळा झाल्यापासून ‘श्रीमन्नारायण स्वरूप गुरुदेव आसंदीवर बसलेले असून त्यांच्या चरणांमध्ये पादुका आहेत आणि महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ त्यांच्या चरणांची पूजा करत आहेत’, हे दृश्य हृदयात अखंड दिसत आहे. हृदयामध्ये डोकावून पाहिल्यास ‘महालक्ष्मी गुरुदेवांच्या चरणांवर फुलांची ओंजळ वाहून कुंकूमार्चन करत आहे, तसेच अक्षता वाहून निरांजनाने ओवाळत आहेत’, असे दृश्य दिसते. कधी कधी ‘परम पूज्य गुरुमाऊली निर्गुणाच्या मुद्रेत आहे’, असे दृश्य दिसते. ही अनुभूती अनुभवतांना संपूर्ण शरिरामध्ये प्रकाश जाणवतो.

– (पू.) सौ. संगीता जाधव, मुंबई (१७.३.२०१९)

पू. (सौ.) संगीता जाधव यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन  !

१. व्यष्टी साधना

१ अ. स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे.

१ आ. अहंमुळे तामसिकता वाढते.

१ इ. परेच्छेने वागलो, तर अहं न्यून होतो.

१ ई. मनात कृतज्ञताभाव असणे महत्त्वाचे आहे.

१ ई १. देव एका चौकटीत नसून सर्वत्र असल्याने त्याला चौकटीत न शोधता प्रत्येक स्थितीत अनुभवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक : ‘देव इथेच भेटणार. तिथे नाही भेटणार. हे केले, तर देव भेटणार. हे केले नाही, तर भेटणार नाही’, असे काही नाही. देवाला कोणतीच चौकट नाही. आपण ‘देव हवा’; म्हणून साधना करतो; पण एक चौकट घालून तेथे देवाला शोधतो आणि ‘तो सापडत नाही’, असे म्हणतो. देव कोणत्याही चौकटीत नाही. ज्या परिस्थितीत देवाने ठेवले, त्यात देवाला शोधले की, आपल्याला आनंद होतो. परिस्थितीत देव असतोच, उदा. आपण काही करू शकत नाही, तर त्या वेळी अनुसंधान तरी ठेवू शकतो ना ? तिथे देव आहेच ना ? ज्या स्थितीत देवाने ठेवले आहे, तेथे देव भेटतोच. मग काळजी कशाला करायची ? तो सर्वत्र आहे, तर त्याला अनुभवायचा प्रयत्न करूया आणि त्याच्या अनुसंधानातील आनंद घेऊया.’

१ ई २. मनासारखे न झाल्यास दुःखी न होता साधकांनी ईश्वरेच्छा समजून घ्यायला हवी ! : ‘एखादी सेवा व्हायला पाहिजे’, असे आपण ठरवतो आणि मनासारखे झाले नाही की, आपल्याला दुःख होते अन् ‘देवाला अपेक्षित असे झाले नाही’, असे वाटते. आपण देवाचे नियोजन पहायला हवे.’

१ ई ३. ‘परात्पर गुरुदेव सर्वशक्तीमान आहेत. त्यांना कोणतीच गोष्ट कठीण नाही. ते सर्वकाही देऊ शकतात; पण आपण त्यासाठी पात्रता निर्माण करणे आवश्यक आहे.’

२. समष्टी साधना

२ अ.  सेवा करण्याचे महत्त्व आणि सेवा कशी करावी ?

२ अ १. सेवा करण्याचे महत्त्व : ‘साधकांचे तन, मन आणि बुद्धी अर्पण व्हावी, यासाठी सेवा आहे. साधकांतील अहं न्यून होण्यासाठी गुरुसेवा करणे आवश्यक आहे. ‘आपली तळमळ वाढावी, आपले मन आणि बुद्धी शुद्ध व्हावी, तसेच अहंचे निर्मूलन व्हावे’, यासाठी गुरुदेवांनी सर्व सेवा निर्माण केल्या आहेत.

२ अ २. सेवा कशी करावी ?

अ. सेवा करतांना अहंचे कार्य मोठ्या प्रमाणात चालू असते. अहंमुळे साधक सेवा करतांना मनाला वाटेल, तसे पालट करत असतो. यासाठी मनाचे न ऐकता उत्तरदायी साधकांना विचारून सेवा करायला हवी.

आ. सेवा करतांना सेवेत मन पूर्णपणे एकरूप केले, तरच मनाचे अर्पण होऊन मनाचे प्रारब्ध अल्प होणार आहे. त्यामुळे मानसिक त्रासही न्यून होणार आहेत.

इ. साधकांनी सेवा करतांना प्रार्थना करणे, देवाला सतत विचारणे, ‘आपल्याकडून देवच सर्व करून घेत आहे’, असा भाव ठेवून कृती करणे आणि देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणे, हे प्रयत्न वाढवायला हवेत.

आपण सेवा व्यवस्थित करत नाही. आपले प्रयत्न अपुरे असतात, तरी देव आपल्याला पुनःपुन्हा सेवेची संधी देतो. यासाठी आपल्याला पुष्कळ कृतज्ञता वाटायला पाहिजे !’

– (पू.) सौ. संगीता जाधव (जून २०१७)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक