‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी परशुरामभूमी सज्ज !

देशभरातील मान्यवरांचे गोव्यात आगमन ! उद्यापासून अधिवेशनाला प्रारंभ !

रामनाथी (फोंडा), ११ जून (वार्ता.) – गोवा येथे गेल्या १० वर्षांपासून होणार्‍या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’मुळे देशात हिंदु राष्ट्राच्या चर्चेला प्रारंभ होऊन त्या दिशेन वाटचालही चालू झाली आहे. यासाठीच यंदाही १२ ते १८ जून या कालावधीत येथील ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी परशुरामभूमी गोवा सज्ज झाली आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने देशभरातील मान्यवरांचे गोव्यात आगमन झाले असून फोंडानगरीचे वातावरण भगवेमय झाले आहे.

या अधिवेशनाला प्रामुख्याने ‘सीबीआय’चे माजी हंगामी संचालक श्री. नागेश्‍वर राव, काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीलन लढा देणारे अधिवक्ता (पू.) हरिशंकर जैन आणि त्यांचे सुपुत्र ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टीस’चे राष्ट्रीय प्रवक्ते अधिवक्ता विष्णु शंकर जैन, भाजपचे तेलंगाणा येथील प्रख्यात आमदार टी. राजासिंह, ‘पनून काश्मीर’चे श्री. राहूल कौल यासंसह अनेक वरिष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक आदी उपस्थित रहाणार आहे. या अधिवेशनाला अमेरिका, इंग्लंड, हाँगकाँग, सिंगापूर, फिजी, नेपाळ या देशांसह भारतातील २६ राज्यांतील ३५० हून अधिक हिंदु संघटनांच्या १ सहस्रांहून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे.

अधिवेशनाची सिद्धता पूर्ण

दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाची सिद्धता पूर्ण झाली आहे. १२ जून या दिवशी आरंभ होणार्‍या या अधिवेशनाला उपस्थित रहाण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांचे रामनाथी येथे आगमन झाले आहे. रामनाथी येथील सनातनचा आश्रम, तसेच कार्यस्थळ श्री रामनाथ देवस्थान येथे हिंदुत्वनिष्ठांसाठी स्वागत कमानीही उभारण्यात आल्या आहेत. यामुळे आलेल्या धर्मप्रेमींचा उत्साह वाढला आहे.