६ मास औषध घेतल्याने चाचणीतील सर्व १८ रुग्ण कर्करोगमुक्त !

कर्करोगावरील नव्या ‘डॉस्टारलिमॅब’ औषधाचा परिणाम !

नवी देहली – अमेरिकेमध्ये एका चाचणीतून गुदाशयाचा (‘रेक्टल’चा) कर्करोग असणार्‍या सर्व १८ रुग्णांना ‘डॉस्टारलिमॅब’ हे औषध देण्यात आल्यानंतर ते पूर्णपणे कर्करोगमुक्त झाल्याचे समोर आले आहे. चाचणीसाठी निवडण्यात आलेल्या रुग्णांनी ६ मास प्रत्येक ३ आठवड्यांनी डॉस्टारलिमॅब घेतले. ‘एंडोस्कोपी’, ‘पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्रॅफी’ (पीईटी स्कॅन) आणि ‘एम्आर्आय स्कॅन’ यांच्या माध्यमांतून चाचण्या करण्यात आल्यानंतरही या रुग्णांच्या शरिरामध्ये नंतर कर्करोगाचा ट्यूमर आढळून आला नाही. या संशोधनाच्या संदर्भातील माहिती समोर आल्यानंतर हे औषध खरोखरच कर्करोगावरील रामबाण उपाय ठरू शकते का ? यासंदर्भात वैद्यकीय क्षेत्रामध्ये चर्चा चालू झाली आहे; मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या, संशोधन आणि अभ्यास आवश्यक असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे. ‘डॉस्टारलिमॅब’ हे औषध प्रयोगशाळेत सिद्ध करण्यात आलेल्या रेणूंपासून बनवण्यात आले आहे. हे औषध मानवी शरिरात पर्यायी प्रतिपिंडांप्रमाणे काम करते.

न्यूयॉर्कच्या ‘मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर’चे डॉ. लुईस ए. डायझ जे. यांनी ‘असा प्रकार कर्करोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे’, असे सांगितले. या रुग्णांवर प्रयोग करण्यापूर्वी कीमोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रकर्म यांसारखे उपचार करण्यात आले होते. या चाचणीमध्ये सहभागी झाल्यानंतर ‘जसजसे उपचार पुढील टप्प्यामध्ये जातील, तसतसे रुग्णांना आतडी, मूत्रपिंड आणि लैंगिकता यांच्या संदर्भातील समस्या निर्माण होऊ शकतात’, अशी चेतावणी आधीच देण्यात आली होती. तरीही या रुग्णांनी हा धोका पत्करून ते यात सहभागी झाले. आश्‍चर्य म्हणजे पहिल्याच टप्प्यात सर्व रुग्ण कर्करोगमुक्त झाले आणि त्यांना पुढील उपचारांची आवश्यकता लागली नाही.