आक्रमक नीतीची आवश्यकता !

भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह विधान केल्यामुळे इस्लामी राष्ट्रांचे पित्त खवळले आहे. यात कतार, ओमान यांसारख्या लिंबू-टिंबू देशांचाही समावेश आहे. ‘भारत सरकारने याविषयी क्षमा मागावी’, ‘नूपुर शर्मा यांच्यावर कारवाई करावी’, अशा विविध मागण्या या देशांनी केल्या आहेत. यामुळे भारतातील भाजपविरोधी आणि राष्ट्रघातकी मानसिकतेच्या टोळ्यांचेही फावले आहे. ‘नूपुर शर्मा यांच्या विधानामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारे नाक कापले गेले आहे’, असे सांगण्यात हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे, निधर्मीवाद्यांची टोळी, राजकीय पक्ष यांच्यात स्पर्धा लागली आहे. ‘नूपुर शर्मा यांनी काय वक्तव्ये केली ?’, ‘ती करणे आवश्यक होते का ?’, याचे मंथन करण्याची ही मुळीच वेळ नाही. शत्रू एकजूट होऊन भारतावर तुटून पडत असेल, तर अंतर्गत कलह बाजूला ठेवून संघटित होऊन त्याला सामोरे जाणे आवश्यक आहे; मात्र भारतात असे होतांना दिसत नाही. येथील भारतविरोधी आणि हिंदुद्वेषी टोळी स्वतःची पोळी भाजण्यात मग्न आहे. काही हिंदुत्वनिष्ठ संघटना शर्मा यांच्या रक्षणासाठी पुढे आल्या आहेत; मात्र ते संघटन तेवढे परिणामकारक दिसत नाही.

इस्लामी देशांनी संघटित होऊन भारतावर तुटून पडणे, हा आंतरराष्ट्रीय षड्यंत्राचा भाग आहे. त्यामुळे त्याला सामोरे जाण्यासाठी कूटनीतीची आवश्यकता आहे. भारत त्याला लागणारे ९५ टक्के कच्चे तेल आखाती देशांकडून खरेदी करतो. त्यामुळे भारताचे हात दगडाखाली आहेत. असे असले, तरी जशी शत्रूची शक्तीस्थळे असतात, तशी मर्मस्थळेही असतात. हे लक्षात घेऊन या इस्लामी देशांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. ही वेळ पडती बाजू घेण्याची नाही, तर इस्लामी देशांच्या विरोधात आक्रमक नीती अवलंबण्याची आहे. भारत आक्रमक झाला नाही, तर या देशांना भारतावर गुरगुरण्याची सवय लागेल. हे थांबायला हवे. भारतातील कट्टरतावादी मुसलमानांनी नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचे व्यवस्थित भांडवल करून हे सूत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे चर्चिले जाईल, हे पाहिले. ‘धार्मिक भावना’, ‘जगभरातील मुसलमानांचे हित’ याविषयी आवई उठवणाऱ्या देशांना खरोखर जगभरातील मुसलमानांविषयी प्रेम आहे का ? असे असते, तर उघूर मुसलमानांना छळणाऱ्या चीनच्या विरोधात ‘ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन’ने दंड थोपटले असते किंवा पाकमधील बलुचिस्तानामधील मुसलमानांवर होणाऱ्या अत्याचारांविषयी पाकला समज दिली असती; मात्र तसे झालेले नाही. सीरियात इस्लामिक स्टेटने तेथील मुसलमानांवरच क्रूर अत्याचार करणे चालू केल्यावर अनेकांनी देश सोडला. त्या वेळी सौदी अरेबिया किंवा अन्य इस्लामी देशांनी या मुसलमानांना आश्रय देण्याचे टाळले होते. या देशांना इस्लामी अस्मितेचे काही पडले नसून ‘काफीर’ भारतावर वरचढ होण्यासाठी संधी हवी आहे. त्यामुळे या प्रकरणात हे देश थयथयाट करत आहेत. अशांना समजेल अशा भाषेत प्रत्युत्तर देण्यासाठी आक्रमक परराष्ट्रनीतीच हवी !