देशसेवेसाठी जीवन समर्पित करणारे अधिकारी निर्माण व्हावेत ! – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

‘स्पार्क’ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि अभ्यासिका यांचे उद्घाटन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

पुणे – देशसेवेसाठी विविध क्षेत्रांत लोक कार्य करत आहेत. एक श्रेष्ठ भारत निर्माण करण्यासाठी कर्तव्यनिष्ठ आणि कार्यप्रवण लोकांची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन समाजातील आर्थिक दुर्बल, उपेक्षित घटकांतील विद्यार्थ्यांना देशसेवेसाठी सिद्ध करण्याच्या उद्देशाने ‘स्पार्क अकॅडमी’चा प्रारंभ केला आहे. देशातील आदर्श व्यक्तिमत्व डोळ्यांसमोर ठेवून देशसेवेसाठी जीवन समर्पित करणारे चारित्र्यवान आणि कर्तव्यदक्ष अधिकारी निर्माण व्हायला हवेत, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. केंद्रीय आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची पूर्वसिद्धता करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि विवेक व्यासपीठ यांनी संयुक्तपणे चालू केलेल्या ‘स्पार्क’ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि अभ्यासिका यांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

माजी पोलीस महासंचालक श्री. दीक्षित म्हणाले, ‘‘देशाच्या प्रगतीसाठी स्वतःला वाहून घेणारे सनदी अधिकारी कार्यरत आहेत. त्यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केलेले आहे. समाजातील सर्व घटकांतील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी या मार्गदर्शन केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे.’’

या वेळी मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, माजी सनदी अधिकारी प्रवीण दीक्षित, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, ‘स्पाकर्’ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक धनंजय काळे, श्री मुकुंद भवन ट्रस्टचे संचालक पुरूषोत्तम लोहिया, मार्गदर्शन केंद्राचे कार्यवाह महेश पोहनेरकर आदी उपस्थित होते.