अमरावती येथे महाराणा प्रताप जयंतीनिमित्त व्याख्यानमाला !

महाराणा प्रताप

अमरावती, ५ जून (वार्ता.) – येथील दर्यापूर तालुक्यात महाराणा प्रताप सेवा समितीच्या वतीने महाराणा प्रताप जयंतीचे औचित्य साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांना प्रमुख वक्ता म्हणून बोलवण्यात आले. या व्याख्यानमालेत ३०० हून अधिक धर्मप्रेमी पुरुष आणि महिला, तसेच युवक उपस्थित होते.

शारीरिक बलासाठी नियमित बलोपासना आणि ईश्वरी अधिष्ठानासाठी साधना करणे आवश्यक ! – नीलेश टवलारे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

अनेक अडचणींना सामोरे जाऊन महाराणा प्रताप यांनी स्वतःमध्ये बालपणापासून क्षात्रतेज निर्माण केले. मेवाड अर्थात स्वराज्याचे रक्षण हेच माझ्या जीवनाचे अंतिम लक्ष्य असा निश्चय त्यांनी केला होता. शारीरिक बलासाठी नियमित बलोपासना आणि ईश्वरी अधिष्ठानासाठी साधना करूनच आपण खर्‍या अर्थाने महाराणा प्रताप अन् तर वीरयोद्धे यांना विनम्र अभिवादन करू शकू.

वीरमातांचा आदर्श घेऊन आपल्या मुलाकडूनही धर्माचरणाचा निश्चय करून घ्या ! – सौ. अनुभूती टवलारे, हिंदु जनजागृती समिती

महाराणा प्रताप यांचे स्मरण करतांना त्यांच्या प्रथम गुरु आणि माता असलेल्या महाराणी जयवंताबाई यांचेही महिलांनी स्मरण करावे. आईच प्रथम आपल्या मुलामध्ये धर्माप्रती बीज रोवू शकते आणि हाच वीरमातांचा आदर्श घेऊन सर्वांनी आपल्या युवा मुलांना सांगावे, ‘‘तुम्ही धर्मकार्य करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. धर्माचरण करण्याचा निश्चयही आजपासूनच करा.”

या वेळी महाराणा प्रताप सेवा समितीचे श्री. जयसिंग मोरे, श्री. प्रदीपभाऊ मलीये, श्री. प्रतापसिंग तंवर या वेळी व्यासपिठावर उपस्थित होते.

क्षणचित्रे

१. घटनास्थळी समितीच्या वतीने ‘क्रांतीकारकांची जीवनगाथा’ सांगणारे फलक प्रदर्शन लावण्यात आले. कार्यक्रमानंतरही बर्‍याच धर्मप्रेमींनी ते फलक न काढण्याविषयी सांगितले.

२. ‘रणरागिणी शाखेच्या वक्त्यांनी महिलांसाठी स्वतंत्र कार्यक्रम घेऊन आम्हाला मार्गदर्शन करावे’, अशी मागणी उपस्थित महिलांनी उत्स्फूर्तपणे मागणी केली.

वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय

१. सध्याच्या काळाच्या परिस्थितीशी जुळवून घेऊन आम्हाला येथे वीरांचे चरित्र सांगण्यात आले. हे आम्हाला पुष्कळ आवडले. – कार्यक्रमाचे सर्व आयोजक

२. रणरागिणीच्या वक्त्यांचे मार्गदर्शन ऐकून आदरणीय (कै.) अपर्णाताई रामतीर्थकर यांचे स्मरण झाले आणि आनंद वाटला. – सौ. रजनी पवार, शिक्षिका (धर्मप्रेमी)