पोलिसांनी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांना ज्ञानवापीमध्ये पूजा करायला जाण्यापासून रोखले !

  • श्रीविद्यामठात मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवून केले नजरकैद !

  • प्रशासनाच्या विरोधामुळे स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांचे उपोषण

जोपर्यंत ज्ञानवापीमध्ये प्रकटलेल्या आदि विश्‍वेश्‍वर शिवलिंगाची पूजा करणार नाही, तोपर्यंत मी अन्न-पाणी घेणार नाही – स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद

वाराणसी (उत्तरप्रदेश) – द्वारका आणि ज्योतिष पीठांचे पीठाधिश्‍वर शंकराचार्य जगद्गुरु स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे विशेष प्रतिनिधी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती ४ जून या दिवशी ज्ञानवापी मशिदीतील वजूखान्यात (नमाजापूर्वी हात-पाय धुण्याची जागा) सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्यास जाणार होते; मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना रोखून त्यांच्या येथील श्रीविद्या मठात नजरकैद केले. श्रीविद्या मठाला पोलिसांकडून वेढा घालण्यात आला आहे. स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी अन्नत्याग करत उपोषण चालू केले आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत ज्ञानवापीमध्ये प्रकटलेल्या आदि विश्‍वेश्‍वर शिवलिंगाची पूजा करणार नाही, तोपर्यंत मी अन्न-पाणी घेणार नाही.

पोलिसांनी सांगितले की, ज्ञानवापीच्या संदर्भातील खटला न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांना ज्ञानवापी परिसरात प्रार्थना करण्याची अनुमती देण्यात आलेली नाही. तरीही ते ज्ञानवापीकडे गेल्यास त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यांच्या श्रीविद्या मठाभोवती ६ पोलीस ठाण्यांच्या पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मठात जाणार्‍या रस्त्यावर अडथळे (बॅरिकेड्स) लावण्यात आले आहेत.

१०० कोटी सनातन धर्मियांच्या पूजेचा अधिकार नाकारू नये !

पूजेची अनुमती नाकारल्यावरून स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांनी प्रशासनाला प्रश्‍न विचारला की, पोलिसांनी आमच्याकडून पूजेचे साहित्य घेऊन कायद्यानुसार आमच्या देवतेची पूजा करावी. आपण अंघोळ करतो, खातो, पाणी पितो आणि आपला देव मात्र तसाच रहातो, हे कसे चालेल ? ज्ञानवापीमध्ये सापडलेले शिवलिंग हे आमचे आदि विश्‍वेश्‍वराचे जुने ज्योतिर्लिंग आहे. देवतेची पूजा केली जाते; कारण त्यात प्राण असतात. देवाला उपाशी किंवा तहानलेले ठेवता येत नाही. त्यांचे स्नान, श्रृंगार, पूजा, प्रसाद आदी नियमित झाले पाहिजेत. आमची छोटीशी मागणी आहे की, आम्हाला दिवसातून एकदा आमच्या आराध्याच्या पूजनाची अनुमती द्यावी. पोलीस आमचा मार्ग अडवून आमच्यासमोर उभे आहेत. पोलीस त्यांचे काम करतील, आम्ही आमचे काम करू. उपासनेचा अधिकार हा प्रत्येक सनातन धर्मियाचा मूलभूत अधिकार आहे. मी प्रशासनाला वारंवार विनंती करत आहे की, आम्हाला ज्ञानवापीत पूजा करू दिली जावी. मी माझ्या सहकार्‍यांना तेथे नेणार नाही, केवळ मला एकट्याला १०० कोटी सनातन धर्मियांच्या वतीने प्रकट झालेल्या देवाची पूजा करू द्यावी. देवाचा पूजा करून घेण्याचा अधिकार डावलू नये.

संपादकीय भूमिका

स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद हिंदूंचे संत असतांना त्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवणार्‍या उत्तरप्रदेश पोलिसांनी कानपूर येथे नमाजानंतर झालेला हिंसाचार रोखण्यासाठी असा बंदोबस्त का ठेवला नाही ?, हे हिंदूंना सांगितले पाहिजे ! धर्मांधांसमोर शेपूट घालणारे पोलीस हिंदूंच्या संतांवर मात्र मर्दुमकी गाजवतात !