विज्ञानाधारित शेतीचे रूप निसर्गविरोधी !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

१. शेतीचे पालटलेले स्वरूप

आमच्या पारंपरिक शेतीत आज आमूलाग्र पालट झाला, उदा. शेती पिकवण्याच्या पद्धती आल्या. अत्याधुनिक शेतीची अवजारे आणि संकरित बी-बियाणे आले. पेरणीपासून धान्याची पोती मिळेपर्यंतची कामे यंत्राद्वारे होऊ लागली.

२. रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचे दुष्परिणाम

अन्नधान्य अधिकाधिक वाढवणे हेच उद्दिष्ट झाले. त्याकरता रासायनिक खते आणि कीटकनाशके यांचा विलक्षण वापर होऊ लागला. पाणी आणि वनस्पती यांवर त्याचे भयंकर दुष्परिणाम झाले. कीटकनाशके आणि रासायनिक खते हा मोठा शाप ठरला. आरोग्याच्या तक्रारी वाढल्या. ‘आधुनिक वैद्यांची देयके भागवतांना शेती विकायची पाळी यावी’, अशी स्थिती झाली. पिण्याचे पाणी, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध, दुग्धजन्य पदार्थ यांत कीटकनाशकांचे प्रमाण भयानक वाढले. शेती आणि धान्यरक्षण यांकरता पर्यावरण अत्यंत विषाक्त करणारी कीटकनाशके, उंदीर इत्यादी प्राण्यांसाठी वापरली जाणारी ‘क्लोरिनेटेड’ कीटकनाशके तर फार भयंकर आहेत.

अ. डीडीटी (कीटकनाशक) तर पर्यावरण विषाक्त करण्यात सर्वाधिक पुढे आहे. युरोप आणि अमेरिका येथे डीडीटीवर कडक बंदी आहे. भारतात मोठ्या प्रमाणात डीडीटीचे उत्पादन आणि वितरण होते. आल्डीन, डायऑल्डान, ॲन्ड्रीन अशा डीडीटी सारख्या कीटकनाशकांचे भारतात कारखाने आहेत.

आ. जगात सर्वत्र बंदी असलेल्या क्लोरिनेटेड हायड्रोकार्बनचे उत्पादन, वितरण आणि वापर भारतात मोठ्या प्रमाणावर होतो.

इ. भयानक अशा १४३ कीटकनाशकांची अधिकृत सूची आहे. त्यावर युरोप आणि अमेरिका येथे बंदी आहे; परंतु भारतात त्यांचे उत्पादन आणि वापर स्वैरपणे होतोे. ही कीटकनाशके साठवण्याची मोठमोठी गोदामे आहेत.

३. रासायनिक कीटकनाशकांमुळे पाणी विषारी होणे

रासायनिक कीटकनाशके पाणी कसे विषारी करतात ?, ते पहा. भारतातील प्रमुख नद्यांच्या पाण्यात डीडीटी २१ सहस्र ९०० नॅनोलिटर, बी.एच्.सी. २७ सहस्र २०० नॅनोलिटर, अल्डोसल्फान २ सहस्र ८९० नॅनोलिटर, ऑल्डीन १ सहस्र ५०० नॅनोलिटर आढळते. शेतीकरता वापरलेली कीटकनाशके शोषल्यामुळे भूमीखालचे पाणी दूषित होऊन पिण्याच्या योग्यतेचे राहिले नाही. या पाण्यामुळे साधे आजार होतातच; पण मुडदूस, संधीवात इत्यादी व्याधीही होतात.

४. रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून हिरवागार ठेवलेला भाजीपाला खाऊन गायीचे दूध विषारी होणे

रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून भाजीपाला आणि गायीचा चारा अनेक मास हिरवागार राखला जातो; परंतु तो खाल्ला की, गायीचे दूध विषारी होते.

५. विषाक्त धान्यामुळे होणारे विकार

रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून जे धान्य पिकते, त्यात विष असते. वरण-भात, पोळी-भाजी असे साधे जेवण आणि दूध हे सात्त्विक अन्नही विषाक्त अन् आरोग्याला अत्यंत घातक असते. दिवसाकाठी डीडीटीचे २७ मि. इतके घातक सेवन होते. एवढे प्रमाण पोटात गेल्यावर ट्यूमर, ल्युकेमिया, तसेच मज्जासंस्था, यकृत आणि मूत्रपिंड यांचे आजार अन् कर्करोग इत्यादी विकार होतात. ‘कीटकनाशकांमुळे होणारे विषाक्त अन्न’ ही ५ लेखांची लेखमाला ‘इंडिया टुडे’ या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यात कोणकोणते भयानक रोग होतात, याची सूचीच (भारत सरकारच्या आणि अन्य क्लिनिक्सच्या संशोधनाचे आकडेच) दिली आहे.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (साप्ताहिक सनातन चिंतन, २.४.२००९)