सिंदखेडराजा येथील राजवाडा दुरुस्तीचे काम पाहून अजित पवार अप्रसन्न !
सिंदखेडराजा (जिल्हा बुलढाणा) – पुरातत्व विभागाच्या कामात सुबकता हवी. जुन्या पद्धतीची कामे त्याच पद्धतीने नक्षीकामाने (डिझाइन) केली जावीत, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील ऐतिहासिक वास्तूंची पहाणी करतांना दिले. २१ मे या दिवशी शहरातील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील कामांची पहाणी करतांना त्यांनी कामांविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. शिवनेरी किंवा अन्य गडकोटांची कामे पहा, असा उपदेशही त्यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. (शिवनेरी आणि अन्य गडकोटांची कामे व्यवस्थित होत असतांना सिंदखेडराजा येथील राजवाडा दुरुस्तीचे काम समाधानकारक का झाले नाही ? अजित पवार यांनी अप्रसन्नता व्यक्त करून न थांबता पुरातत्व विभागातील उत्तरदायी असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेच गडप्रेमींना वाटते. – संपादक)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील राजवाडा येथे जाऊन राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचे दर्शन घेऊन शहरातील सावकारवाडा, काळकोट त्यातील वस्तूसंग्रहालयाची इमारत, रंगमहाल, नीलकंठेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, राजे लखुजीराव जाधव यांची समाधी आणि पुतळा बारवेची बारकाईने पहाणी करून आवश्यक ते निर्देश दिले. प्रत्येक ऐतिहासिक वास्तूत काय सुधारणा आवश्यक आहेत ? याच्या सूचनाही त्यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या दौऱ्यात पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस्. राममूर्ती यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.