श्रीराममंदिरासाठी लागणार्‍या गुलाबी दगडांची टंचाई

१५ टक्केच दगड प्राप्त

जयपूर (राजस्थान) – अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर उभ्या रहात असलेल्या भव्य श्रीराममंदिरासाठी लागणार्‍या गुलाबी दगडाची टंचाई निर्माण झाली आहे.

१. याविषयी माहिती देतांना ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे सरचिटणीस चंपत राय यांनी म्हणाले की, मंदिरासाठी ४ लाख ७० सहस्र घन फूट गुलाबी दगड लागणार आहेत. आतापर्यंत ७० सहस्र घन फूट, म्हणजे केवळ १५ टक्केच दगड अयोध्येत पोचले आहेत. खाण विभागाने ज्या ४१ खाणी भाडेतत्त्वावर दिल्या आहेत, त्यांपैकी १४ खाणींतच गुलाबी दगड आहेत.

२. टंचाईसाठी विविध कारणे सांगण्यात आली आहेत. यांत लिलाव झालेल्या ४१ खाणींमध्ये १५ जूनपूर्वी उत्खनन करणे कठीण आहे. खाण लीजधारकांकडे सोपवण्याची कारवाई मेअखेरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर १० ते १५ दिवस सिद्धतेसाठी लागतील. १५ दिवस उत्खनन झाल्यानंतर पावसाळा चालू होईल. त्यामुळे हे काम दिवाळीनंतरच चालू होईल. १४ खाणींतच ‘ए’ दर्जाचा गुलाबी दगड आहे. दिवस-रात्र उत्खनन झाले, तरी दगडांचा पुरवठा करण्यास २ वर्षे लागतील. दगड घडवण्यासाठी वेगळा वेळ लागेल.