चीनने तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका सैनिकी कारवाई करील ! – जो बायडेन  

टोकियो (जपान) – चीनने  तैवानवर आक्रमण केल्यास अमेरिका सैनिकी कारवाई करेल, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी येथे ‘क्वाड’ देशांच्या बैठकीनंतर पत्रकारांच्या एका प्रश्‍नाच्या उत्तरात दिली. अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांची ‘क्वाड’ ही संघटना आहे. ‘तैवान रिलेशन अ‍ॅक्ट’नुसार अमेरिका तैवानचे संरक्षण करण्यास बांधील आहे. यामुळेच अमेरिका तैवानला शस्त्रपुरवठा करते.

१. बायडेन पुढे म्हणाले की, ‘वन चायना’ धोरणाला आम्ही मान्यता दिली, तसेच आम्ही त्यावर स्वाक्षरीही केली. तथापि ‘तैवान बलपूर्वक हिसकावून घेतले जाऊ शकते’, असा विचार करणे चुकीचे आहे. तैवानविरुद्ध बळाचा वापर करण्याचे चीनचे पाऊल केवळ अन्यायकारकच ठरणार नाही, तर त्यामुळे संपूर्ण प्रदेश अस्थिर होईल.

२. चीन तैवानला त्याचा भाग मानतो, तर तैवान स्वत:ला स्वतंत्र देश मानतो. तैवानला चीनच्या राजकीय मागण्यांपुढे झुकण्यास भाग पाडणे आणि चीनचे नियंत्रण मान्य करायला लावणे, हे चीनचे ध्येय आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाप्रमाणे चीन तैवानवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धाचा मार्ग अवलंबू शकतो, अशी भीती निर्माण झाली होती.