पेशावरमध्ये २ शीख उद्योजकांची हत्या !

सलजीत सिंह आणि रणजीत सिंह

पेशावर (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा प्रांतात अज्ञात बंदूकधार्‍यांनी २ शीख उद्योजकांची गोळ्या घालून हत्या केली. मोटारसायकलवरून आलेल्या दोन आक्रमणकर्त्यांनी केलेल्या गोळीबारात सलजीत सिंह आणि रणजीत सिंह हे दोघे जागीच मरण पावले, अशी माहिती पोलिसांनी दिली. आक्रमणानंतर दोघे आक्रमणकर्ते पळून गेले. मसाल्यांचा व्यापार करत असलेल्या दोघा मृतांची पेशावरपासून अनुमाने १७ किलोमीटरवर असलेल्या सरबंद येथील बाटा ताल बाजारात दुकाने आहेत. दोघे दुकानांत बसलेले असतांना आक्रमणकर्त्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. अद्याप कोणत्याही गटाने या हत्यांचे दायित्व स्वीकारलेले नाही.

या घटनेवर भाजपचे नेते मनजिंदर सिरसा म्हणाले की, पाकमध्ये शिखांना घाबरवले जात आहे. यासंदर्भात पाकला अनेक वेळा सांगण्यात आले आहे; परंतु शिखांच्या हत्या रोखण्यासाठी त्यांच्याकडून कोणतीच उपाययोजना काढली गेलेली नाही. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान यांनीही या हत्यांचा निषेध केला आहे.

सात मासांपूर्वी पेशावर शहरातच सतनाम सिंह नावाच्या शीख व्यक्तीचीही अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणावरही कारवाई केलेली नाही.

संपादकीय भूमिका

नेहमी पाकची तळी उचलून भारताला वेठीस धरणारे खलिस्तानवादी पाकमधील शिखांच्या वारंवार होणार्‍या हत्यांसंदर्भात मूग गिळून गप्प बसतात ! यातून अशांना शिखांविषयी किती प्रेम आहे, हे उघड होते !