पू. राजाराम नरुटे (वय ८९ वर्षे) संत म्हणून घोषित होण्याच्या संदर्भात साधिकेला स्वप्नाच्या माध्यमातून मिळालेली पूर्वसूचना !

पू. राजाराम नरुटे

१. स्वप्नात आकाशात एक गरुड उंच उडतांना दिसणे आणि एका पिल्लाने त्या गरुडाच्या पंखाला घट्ट धरलेले असणे

‘१४.३.२०२२ या दिवशी सकाळी ६ ते ६.१० या वेळेत मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात मला समोर असलेल्या एका खांबावर गरुड दिसला. मी कोणालातरी सांगत होते, ‘तो बघा, गरुड ! तो बघा, गरुड !’ त्यानंतर तो लगेचच आकाशात उंच उडाला. मी मान वर करून त्याला उडतांना पहात होते. तो उंच आकाशात गेल्यावर त्याचा रंग श्रीकृष्णाच्या रंगाप्रमाणे झाला. एका पिल्लाने त्या गरुडाच्या पंखाला घट्ट धरले होते. ते पाहून मी म्हणाले, ‘ही तर गरुडमाता आहे.’ त्यानंतर मला लगेचच जाग आली.

सौ. सुजाता सावंत

२. ‘स्वप्नात गरुडाचे दर्शन झाल्याने आनंदवार्ता ऐकायला मिळणार’, असा विचार मनात येणे आणि संध्याकाळी श्री. राजाराम नरुटे  संतपदी विराजमान झाल्याचे कळणे

मला स्वप्नात गरुडाचे दर्शन झाले. त्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला. ‘गरुड दिसल्यावर शुभवार्ता ऐकायला मिळते’, असे साधकांना बऱ्याच वेळा अनुभवायला मिळाले आहे. त्यामुळे मी विचार केला, ‘मला स्वप्नात गरुड दिसला, म्हणजे आज काहीतरी आनंदवार्ता मिळणार.’

त्या दिवशी संध्याकाळी ६ वाजता भोजनकक्षात फलक लावला होता. त्यावर लिहिले होते, ‘श्री. राजाराम नरुटे (वय ८९ वर्षे) यांना संत म्हणून घोषित करण्यात आले आहे.’ ती आनंदवार्ता ऐकून मला पुष्कळ आनंद झाला.

३. ‘स्वप्नात आकाशात उडतांना दिसलेली गरुडमाता, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्या पंखाला घट्ट धरून असलेले पिल्लू, म्हणजे पू. राजाराम नरूटे आहेत’, असे जाणवणे

त्यानंतर मला १५.३.२०२२ या दिवशी सकाळी त्या स्वप्नाची पुन्हा आठवण झाली. ‘स्वप्नात आकाशात उडतांना दिसलेली गरुडमाता, म्हणजे आपली गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि तिच्या पंखाला घट्ट धरून असलेले पिल्लू, म्हणजे पू. राजाराम नरुटे आहेत’, असे मला जाणवले. त्या गुरुमाऊलीने पू. राजाराम नरुटे यांना त्यांच्या त्यागाचे फळ दिले आणि त्यांना ‘संत’ म्हणून घोषित केले.

‘हे गुरुमाऊली आणि पू. राजाराम नरुटेबाबा, ‘आम्हाला तुमच्या चरणांचा विसर पडू देऊ नका अन्  अखंड भावस्थितीत रहाता येऊ द्या’, अशी आपल्या कोमल चरणी प्रार्थना करते.’

– सौ. सुजाता चंद्रकांत सावंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.३.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक