सुप्रसिद्ध संवादिनीवादक सूरलयरत्न पं. विश्वनाथ कान्हेरे आणि सुप्रसिद्ध तबलावादक पं. तुळशीदास नावेलकर यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

(‘सूरलयरत्न’ म्हणजे सूर आणि लय यांवर प्रभुत्व असलेली व्यक्ती. ‘सूरलयरत्न’ ही संगीतातील एक पदवी आहे.)

डावीकडून श्री. मिलिंद परब, पं. तुळशीदास नावेलकर आणि सूरलयरत्न पं. विश्वनाथ कान्हेरे यांना सनातन प्रभात नियतकालिकांची माहिती सांगतांना होमिओपॅथी वैद्या (सुश्री) आरती तिवारी

रामनाथी (गोवा) – रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध संवादिनीवादक (‘हार्मोनियम’वादक) सूरलयरत्न पं. विश्वनाथ कान्हेरे आणि गोव्याचे सुप्रसिद्ध तबलावादक पं. तुळशीदास नावेलकर यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमास १० मे या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्या दोघांचे शिष्य संवादिनीवादक श्री. दत्तराज सुर्लकर आणि तबलावादक श्री. मिलिंद परब हेही उपस्थित होते. या प्रसंगी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या भरतनाट्यम् विशारद होमिओपॅथी वैद्या (सुश्री) आरती तिवारी यांनी त्यांना आश्रम दाखवला. विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांनी विश्वविद्यालयाच्या संगीतविषयक संशोधनपर कार्याची त्यांना माहिती करून दिली. या कालावधीत विश्वविद्यालयाच्या वतीने पं. कान्हेरे यांच्या संवादिनी वादनाच्या संशोधनाचा प्रयोगही घेण्यात आला.

सूरलयरत्न पं. विश्वनाथ कान्हेरे यांचा परिचय !

सूरलयरत्न पं. विश्वनाथ कान्हेरे हे एक नामवंत संवादिनीवादक असून सध्या ते महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी संवादिनीचे आरंभीचे शिक्षण त्यांचे वडील कीर्तनकार ह.भ.प. रामचंद्रबुवा कान्हेरे यांच्याकडे घेतले. त्यांना पं. एकनाथ ठाकुरदास, पं. गोविंदराव पटवर्धन, पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. राम मराठे हे गुरुस्थानी लाभले. पंडितजींनी अनेक नामवंत कलाकारांना गायनात संवादिनीवर साथ केली आहे. ते संवादिनीवादनाचे एकल (सोलो) कार्यक्रमही करतात.

पं. तुळशीदास नावेलकर यांचा परिचय !

प्रसिद्ध तबलावादक पं. तुळशीदास नावेलकर हे गोव्यातील माशेल गावाचे रहिवासी आहेत. त्यांनी तबलावादनाचे शिक्षण पं. यशवंत केरकर आणि पं. प्रभाकर च्यारी यांच्याकडे घेतले. अनेक नामवंत कलाकारांना त्यांनी तबल्यावर साथसंगत केली आहे. गायक आणि वादक यांना उत्कृष्ट साथसंगत करणे, हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे.

पं. विश्वनाथ कान्हेरे आणि पं. तुळशीदास नावेलकर यांनी व्यक्त केलेले मनोगत

१. पं. विश्वनाथ कान्हेरे म्हणाले, ‘‘साधक लहान वयात आश्रमात साधना करण्यासाठी आले आहेत. त्यांना साधनेविषयी समजत आहे, हे केवळ देवाच्या कृपेनेच होऊ शकते. तुम्हाला देवाने जे दिले आहे, त्याची जोपासना करा, ते वाढवा; कारण देवाने त्यासाठी तुम्हाला निवडले आहे.’’

संगीताविषयी पं. कान्हेरे म्हणाले, ‘‘आपण साधनेसाठी जी वेळ ठरवतो, ती वेळ पाळायला हवी; कारण त्या वेळी संबंधित देवता त्या ठिकाणी उपस्थित असते, अन्यथा त्या देवतेचा अपमान होतो.’’

२. पं. तुळशीदास नावेलकर म्हणाले, ‘‘या आश्रमात भारतीय संस्कृतीचे संवर्धन आणि प्रसार यांविषयी पुष्कळ चांगले कार्य चालू आहे. आम्ही गोव्यात असूनही आम्हाला हे ठाऊक नव्हते. मी माझ्या परिचितांनाही येथे घेऊन येईन.’’ या वेळी त्यांनी साधकांना तबलावादनाविषयी काही मार्गदर्शनपर सूत्रेही सांगितली.