मुसलमानांनी देशाशी आणि भूमीशी प्रामाणिक रहावे ! – इजिप्तचे मंत्री डॉ. महंमद मोख्तार गोमा

अबूधाबी (संयुक्त अरब अमिरात) – मुसलमान समाजाला २ प्रकारची एकजूट हवी आहे. यातील पहिली विवेकशील आणि तर्कसंगत स्तरावरील आहे. ही या परिषदेकडूनही सांगण्यात येत आहे. दुसरी एकजूट काल्पनिक आणि अशक्य आहे. ती  कट्टरतावादी आतंकवादी संघटना त्यांच्या लाभासाठी करत आहेत. यानुसार ते जगभरात मुसलमानांचे एक राष्ट्र आणि एक ध्वज आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आताच्या आधुनिक काळात अशा प्रकारच्या नव्या राष्ट्राची स्थापना करणे अशक्य असल्याने त्याऐवजी प्रत्येक मुसलमानाने त्याच्या देशाशी आणि भूमीशी प्रमाणिक रहाणे आवश्यक आहे, असे परखड विचार इजिप्तचे मंत्री डॉ. महंमद मोख्तार गोमा यांनी येथे मांडले. ते येथे आयोजित ‘वर्ल्ड मुस्लिम कम्युनिटीज काउंसिल’च्या २ दिवसांच्या परिषदेत बोलत होते. ‘नव्या राष्ट्राची स्थापना हा एक व्यर्थ प्रयत्न आहे, जो राष्ट्राला दुर्बल बनवणारा आणि मुसलमानेतर समुदायांमध्ये रहाणार्‍या अल्पसंख्यांक मुसलमानांना वेगळे पाडणारा आहे’, असेही डॉ. गोमा या वेळी स्पष्ट केले.

१. डॉ. गोमा पुढे म्हणाले की, कुराणमधील आयते (वाक्ये) ज्या वेळी लिहिण्यात आली, त्या वेळच्या संदर्भात पाहिले गेले पाहिजे. तसेच ती ज्यासाठी बनवण्यात आली होती, तेही पाहिले पाहिजे. आताच्या काळात आतंकवादी संघटना त्यांच्या हितासाठी या आयतांचा वापर करत आहेत.

२. ‘वर्ल्ड मुस्लिम कम्युनिटीज काउंसिल’चे सरचिटणीस महंमद बेचारी यांनी सांगितले की, ही परिषद इस्लामच्या एकतेसाठीचे पहिले पाऊल आहे. मुसलमान समाजामध्ये असलेली फूट सुधारण्याची आवश्यकता आहे. सुन्नी मुसलमानांना आव्हानांचा सामना करावा लागतो; मात्र आज येथे शिया मुसलमानही सहभागी आहेत. भविष्यात या संदर्भात चर्चा करावी लागेल.

मुसलमानांच्या एकतेचा आधार विज्ञान असला पाहिजे ! – शेख नाहयान बिन मुबारक, सहिष्णुता मंत्री, संयुक्त अरब अमिरात

संयुक्त अरब अमिरातचे सहिष्णुता मंत्री शेख नाहयान बिन मुबारक यांनी म्हटले की, मुसलमानांच्या एकतेचा आधार विज्ञान असला पाहिजे. पर्यावरण स्थिरता आणि अन्नसुरक्षा यांसारख्या विषयांमध्ये मुसलमान समाजाची एकजूट असली पाहिजे. यासाठी मुसलमान समाजाच्या आतील आणि बाहेरील आव्हाने लक्षात घेणे आवश्यक आहे.

आतंकवादी आक्रमण करणारे मुसलमान आणि पीडितही मुसलमान !

मेरीलँड विश्‍वविद्यालयाने वर्ष २०१६ मध्ये जगभरातील आतंकवादावर केलेल्या अभ्यासानुसार गेल्या एक दशकात झालेल्या ७० सहस्र ७६७ आतंकवादी आक्रमणांचा विचार करण्यात आला. यातून लक्षात आले की, यातील ८५ टक्के आतंकवादी आक्रमणे इस्लामी स्टेट आणि अल् कायदा यांच्याकडून इस्लामी देशांमध्ये करण्यात आले होती आणि यातील पीडितही मुसलमान होते.