२५.५.२०२२ या दिवसापर्यंत सर्व संगणकांची स्वच्छता करावी !

संगणकीय सेवा करणाऱ्या साधकांसाठी महत्त्वाची सूचना !

‘लवकरच पावसाळा चालू होईल. पावसाळ्यामध्ये वातावरणात दमटपणा अधिक असतो. त्यामुळे संगणक आपोआप बंद होणे, ‘रिस्टार्ट’ होणे आदी अडचणी येऊन सेवेतील वेळ वाया जातो. संगणकांमध्ये धूळ साचली असल्यास त्यांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो, तसेच मोठ्या प्रमाणावर अनिष्ट शक्तींचे अडथळे येतात. हे टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी संगणकांची स्वच्छता करणे आवश्यक असते. आश्रमातील, तसेच धर्मप्रसाराची सेवा करणाऱ्या साधकांनी २५.५.२०२२ या दिवसापर्यंत सर्व संगणकांची पुढीलप्रमाणे स्वच्छता करावी.

१. ‘व्हॅक्युम क्लीनर’ वा ‘ब्लोअर’ ने सी.पी.यू.ची स्वच्छता करावी. सी.पी.यू.च्या पार्टला हानी पोचू नये, यासाठी ‘व्हॅक्युम क्लीनर’ वा ब्लोअर सी.पी.यू.पासून साधारण १ फूट अंतरावर ठेवावा. (‘व्हॅक्युम क्लीनर’ वा ‘ब्लोअर’ यांमधून येणाऱ्या हवेच्या दाबाचा (प्रेशरचा) अंदाज घेऊन हे अंतर अल्प-अधिक करता येईल.) त्यानंतर सी.पी.यू. बाहेरील बाजूने सुक्या कापडाने पुसून घ्यावा.

२. मॉनिटर आणि माऊस सुक्या कापडाने पुसावा. मॉनिटरची स्क्रीन होजिअरीच्या (बनियनच्या कापडाप्रमाणे असलेल्या) सुक्या कापडाने पुसावी. ‘एलसीडी स्क्रीन क्लीनर’ उपलब्ध असल्यास त्याचाही काळजीपूर्वक वापर करता येईल. क्लीनर थेट ‘मॉनिटर’ला न लावता एका कपड्याला लावून मॉनिटर पुसावा.

३. चित्रकलेच्या जुन्या ब्रशने ‘की-बोर्ड’स्वच्छ करावा.  ‘व्हॅक्युम क्लीनर’ वा ‘ब्लोअर’ ने की-बोर्डची स्वच्छता करतांना ‘व्हॅक्युम क्लीनर’ वा ब्लोअर ‘की-बोर्ड’ पासून साधारण १ फूट अंतरावर ठेवावा.

अशी स्वच्छता प्रत्येक मासातून एकदा करावी. ‘आश्रमसेवकांनी आश्रमांतील सर्व संगणकांची स्वच्छता वरील समयमर्यादेत पूर्ण होईल’, याचे नियोजन करावे.’