‘आवाजी’ अत्याचाराचे पाठीराखे !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविषयी घेतलेला आक्रमक पवित्रा सध्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर चर्चेचा विषय बनला आहे. वर्षानुवर्षे जे हिंदूंच्या मनात होते, किंबहुना त्यांनी जे ‘आवाजी’ अत्याचार सहन केले, त्या सूत्राला राज ठाकरे यांनी हात घातला आहे. त्यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंगे बंद करण्यासाठी दिलेल्या समयमर्यादेमुळे सरकार आणि पोलीस यांची झोप उडाली आहे. त्याची प्रचीती महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांतील मशिदींसमोर ठेवण्यात आलेल्या कडेकोट पोलीस बंदोबस्ताद्वारे आली. हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी नेहमीप्रमाणे पोलिसांनी प्रयत्न केले. त्यांनी राज ठाकरे यांच्याविरुद्ध १ मे या दिवशी संभाजीनगर येथे झालेल्या सभेच्या प्रकरणी गुन्हा नोंदवला. त्यापाठोपाठ एका आकडेवारीनुसार पोलिसांनी मनसेच्या उणेपुरे ३ सहस्र कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवल्या. इतकेच नव्हे, तर ‘केंद्रीय राखीव पोलीस दला’च्या (सी.आर्.पी.एफ.च्या) तब्बल ८७ तुकड्या आणि ३० सहस्रांहून अधिक गृहरक्षक दलाचे सैनिक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. यासह पोलिसांनी ‘कुणीही कायदा हातात घेऊ नये, अन्यथा कारवाई केली जाईल’, अशी चेतावणी दिली. हे सर्व पाहिल्यावर प्रश्न पडतो की, पोलिसांनी एवढे कष्ट जर मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी घेतले असते, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. पोलीस एकीकडे हिंदूंना अशी चेतावणी देत आहेत; परंतु मशिदींवरील भोंगे काढण्याचा सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश धुडकावून धर्मांध लोक कोणती कायदा आणि सुव्यवस्था राखत आहेत ? याविषयी पोलीस तोंड का उघडत नाहीत ? या सूत्रावर ते शेपूट घालून का बसतात ? खरे तर सर्वाेच्च न्यायालयाने वर्ष २००५ मध्येच भोंग्यांविषयी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. मुंबई उच्च न्यायालयानेही अनधिकृत भोंग्यांवर आणि आवाजाची मर्यादा न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्याचा स्पष्ट आदेश दिला आहे. न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही करण्याचे दायित्व राज्य सरकार आणि पोलीस यांच्यावर आहे. मग ‘भोंग्यांविषयी न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतांनाही पोलिसांनी आतापर्यंत मशिदींवरील अनधिकृत भोंगे का उतरवले नाहीत ?’, हा खरा प्रश्न आहे. अशा वेळी पोलीस न्यायालयाला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकत असल्याचे नको ते कारण देऊन कारवाईपासून पळून जातात, ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे ‘समाजावरील या ‘आवाजी’ अत्याचाराचे पोलीसच एकप्रकारे पाठीराखे आहेत’, असे का म्हणू नये ? अनधिकृत मशीद किंवा दर्गे पाडण्याच्या संदर्भातही पोलिसांची सर्रास हीच भूमिका असते; पण हेच पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हिंदूंच्या विरोधात सहस्रो, लाखो पोलीस रस्त्यावर उतरवतात ! थोडक्यात धर्मांधांच्या आक्रमकतेसमोर पोलीस थरथर कापतात; पण हिंदूंसमोर मर्दुमकी गाजवतात. आझाद मैदान दंगलीच्या वेळी धर्मांधांनी पोलिसांची काय अवस्था केली होती, हे साऱ्या देशाने पाहिले आहे. त्यामुळे पोलीस धर्मांधांच्या विरोधात जायला सिद्ध नसतात. उलट मुसलमानांसाठी सर्वत्र ‘इफ्तार’च्या मेजवान्या देतात. पोलिसांच्या अशा बोटचेप्या भूमिकेमुळेच महाराष्ट्रात भोंग्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून चिघळला आहे.

‘हिंदुविरोधी भोंगे’ही बंद व्हावेत !

मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांना गेली कित्येक दशके विरोध होत आहे. पूर्वी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सोडले, तर एकाही नेत्याने कधी या कर्णकर्कश भोंग्यांच्या संदर्भात रोखठोक भूमिका घेतल्याची इतिहासात नोंद नाही. त्यानंतर आता भोंग्यांविषयी बाळासाहेबांसारखीच आक्रमक भूमिका त्यांचे पुतणे राज ठाकरे यांनी घेतली आहे. याचे खरे तर सर्वांनी स्वागत करायला हवे. राज ठाकरे यांनी ‘मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांचा आवाज बंद झाला नाही, तर मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करू’, अशी चेतावणी दिली. अपेक्षेप्रमाणे त्यास विरोध झाला. तथापि ठाकरे यांनी ‘भोंग्यांच्या सूत्राकडे धार्मिक दृष्टीने बघू नये’, असे वारंवार सांगितले आहे. ते सत्यही आहे; कारण इस्लामनुसार अजान ही सचेतन व्यक्तीने द्यायची असते. अजान देणाऱ्याने ती भोंग्यांद्वारे देणे, हे इस्लामविरोधी मानले गेले आहे. त्यामुळे काही इस्लामी राष्ट्रांत अजानसाठी आजही भोंग्यांचा वापर केला जात नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. राज ठाकरे यांनी भोंग्यांविषयी मांडलेली वस्तूस्थिती गंभीर आहे. ते म्हणाले की, भोंगे उतरवण्याची चेतावणी देऊनही मुंबईतील १३५ मशिदींनी पहाटे ५ वाजण्यापूर्वी, म्हणजे सर्वाेच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळेचे उल्लंघन करून भोंग्यांद्वारे अजान दिली, तीही कडेकोट पोलीस बंदोबस्तात ! अशा मशिदींवर सरकार काय कारवाई करणार आहे ? ‘मुसलमानांना जी काही प्रार्थना करायची आहे, ती त्यांनी मशिदीत किंवा घरात करावी, त्यासाठी भोंगे कशासाठी हवेत ? भोंग्यांद्वारे तुम्हाला तुमची प्रार्थना कुणाला आणि कशासाठी ऐकवायची असते ? ‘भोग्यांद्वारे आजारी, लहान मुले आदींना त्रास होतो, अशांचा विचार करायला हवा. माणुसकीपेक्षा त्यांना त्यांचा धर्म मोठा वाटतो का ?’, या ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे पोलिसांकडे आहेत का ? गंभीर गोष्ट म्हणजे राज्यातील अनेक मशिदी या अनधिकृत असूनही त्यांवरील अनधिकृत भोंग्यांना पोलिसांनी अधिकृत अनुमती दिल्याचे त्यांनी सांगितले. अशांवर सरकार काय कारवाई करणार आहे ?, हेही हिंदूंना समजले पाहिजे. हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी ध्वनीप्रदूषणाची आठवण होणारे पुरो(अधो)गामी, नास्तिक आदी आता भोंग्यांद्वारे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविषयी अवाक्षरही काढत नाहीत. राज ठाकरे यांनी हे आंदोलन एका दिवसाचे नसून ते चालूच ठेवण्याची गर्जना केली आहे. त्यामुळे पोलिसांसमोरही प्रतिदिनचा प्रश्न असणारच आहे. सर्वत्रचे अनधिकृत भोंगे हटवणे, हाच या समस्येवरील रामबाण उपाय आहे; पण पोलीस या भोंग्यांवर कदापि कारवाई करणार नाहीत, उलट पोलिसांचे हिंदूंच्या विरोधातील कारवाईरूपी भोंगे नित्यनेमाने वाजत रहातील ! खरे तर हेही भोंगे बंद होण्याची आवश्यकता आहे !

अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत अनुमती देणाऱ्या पोलिसांची चौकशी झाली पाहिजे !