पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३ दिवसीय युरोप दौर्‍याला प्रारंभ

बर्लिन (जर्मनी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३ दिवसीय युरोप दौर्‍यास २ मे पासून प्रारंभ झाला. पंतप्रधान मोदी हे जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या देशांच्या दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये पोचले आहेत. जर्मनीमध्ये ते ६ व्या ‘भारत-जर्मनी इंटर गव्हर्नमेंटल कन्सल्टेशन’ या कार्यक्रमात जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्यासमवेत सहभागी झाले आहेत. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी बर्लिनमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले. युरोप खंडात भारतीय वंशाचे १० लाखांहून अधिक लोक रहातात. त्यांपैकी मोठ्या संख्येने जर्मनीमध्ये रहातात.

पंतप्रधान मोदी ३ मे या दिवशी ‘इंडो-नॉर्डिक परिषदे’त सहभागी होतील. ‘नॉर्डिक’ प्रदेशात डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड, नॉर्वे आणि स्वीडन यांचा समावेश आहे.

त्यानंतर पंतप्रधान मोदी डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनमध्ये भारतियांना संबोधित करणार आहेत. शेवटी पंतप्रधान मोदी पॅरिसमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार आहेत.