कोरोनाचा नियोजनबद्धरित्या सामना करून महाराष्ट्राने देशाला उदाहरण दिले ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

भगतसिंह कोश्यारी

मुंबई – राज्यातील ९२ टक्क्यांपेक्षा अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीचा न्यूनतम एक डोस देण्यात आला आहे. उर्वरित लसीकरण गतीने पूर्ण होत आहे. नीती आयोगाने घोषित केलेल्या निर्यात सिद्धता निर्देशांकात महाराष्ट्र राज्य देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. कोरोनाच्या तीन लाटांचा नियोजनबद्ध रितीने सामना करत महाराष्ट्राने देशासमोर एक उदाहरण निर्माण केले आहे, असे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले. महाराष्ट्राच्या ६२ व्या वर्धापनदिनाच्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते.

या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, ‘‘इलेक्ट्रिक वाहनांविषयी राज्य शासनाने सिद्ध केलेले धोरण व्यापक आणि सर्वांगीण आहे. त्यावर कार्यवाही चालू झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी १५७ टक्क्यांनी वाढली आहे. राज्यातील निर्यातीत वृद्धी करण्यासाठी राज्याचे स्वतंत्र कृषी निर्यात धोरण सिद्ध करण्यात आले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण न्यून व्हावा, यासाठी शासन प्रवासी जलवाहतुकीला चालना देत आहे. मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मेट्रो प्रकल्पांच्या कामांना अधिक गती देण्यात आली आहे. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.’’