ठोस पुरावे नसल्यास संबंधित जागा नमाजपठणासाठी ‘धार्मिक स्थळ’ मानले जाऊ शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – जुनी भिंत अथवा स्तंभ यांठिकाणी पूर्वीपासून धार्मिक कृती होत असल्याचे पुरावे नसतील आणि त्याचा सध्या उपयोगही होत नसेल, तर ती जागा  नमाजपठणासाठी ‘धर्मिक स्थळ’ मानले जाऊ शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ‘राजस्थान वक्फ बोर्डा’च्या याचिकेवर देत ही याचिका फेटाळून लावली. यापूर्वी राजस्थान उच्च न्यायालयानेही असाच निर्णय दिला होता. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने म्हटले की, या संदर्भात याचिकाकर्ते ठोस पुरावे सादर करू शकले नाही.
राज्यातील भीलवाडा येथील भूमी ‘जिंदल सा लिमिटेड’ या आस्थापनाला खाणीसाठी देण्यात आली आहे. याविरोधात ‘वक्फ बोर्डा’ने याचिका प्रविष्ट केली होती. यात म्हटले होते की, जी भूमी या आस्थापनाला देण्यात आली आहे, तेथे एक जुनी भिंत आणि स्तंभ असून त्याला ‘तिरंगा की कलंदरी मस्जिद’ म्हटले जाते. तेथे पूर्वीपासून नमाजपठण केले जाते. त्यामुळे ही जागा सुरक्षित करण्यात यावी.