ज्या समाजाला हिंसा आवडते, तो शेवटचे दिवस मोजत आहे !

अमरावती येथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची दंगलखोरांना चेतावणी

सरसंघाचालक डॉ. मोहन भागवत

अमरावती – कोणत्या धर्मपिठावर कुणाचे पीठारोहण होत असेल, तर तिथे माझे काम नाही. आम्ही मंदिरांच्या बाहेर दांडा घेऊन रखवाली करणारे लोक आहोत. मंदिराच्या आतील गोष्टी आमच्या हातातील नाहीत. ज्या समाजाला हिंसेची आवड आहे, तो शेवटचे दिवस मोजत आहे. हिंसेमुळे कुणालाच लाभ होत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नुकतेच येथे केले. येथील सिंधी समाजाच्या सामाजिक कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी जगद्गुरु शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती उपस्थित होते. या प्रसंगी सिंधी समाजाचे संजय शेरपुरिया यांनी पाकिस्तानात रहाणाऱ्या हिंदूंच्या दु:खावर लिहिलेल्या ‘मैं माधोभाई, अ पाकिस्तानी हिंदू’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीरामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त देशातील अनेक भागांमध्ये झालेल्या हिंसाचारांच्या पार्श्वभूमीवर डॉ. भागवत यांच्या या विधानाकडे पाहिले जात आहे.

डॉ. भागवत पुढे म्हणाले की,

. सर्व समुदायांनी मिळून मानवतेचे रक्षण केले पाहिजे. आपण हिंसाचार सोडून शांतता राखली पाहिजे.

२. संत आणि समाज एकत्र आल्यास सरकारला त्यांच्या मागे उभे रहावेच लागेल.

. एक दिवस नक्कीच भारत पुन्हा एकत्र येईल. काही सिंधी बांधव आपला धर्म आणि भूमी यांच्या रक्षणासाठी पाकिस्तानात राहिले होते. अनेक लोक भूमी न वाचवता आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी भारतात आले. देशाच्या विकासात सिंधी समाजाचे योगदान आहे.

४. सध्याचे केंद्र सरकार असो वा अन्य कोणतेही सरकार, ते समाजाच्या दबावाखालीच काम करते. ‘सिंधी युनिव्हर्सिटी’ आणि संपूर्ण समाज अखंड भारत करण्यासाठी इच्छुक आहे.

५. सिंधी संस्कृती आणि भाषा यांच्या संवर्धनासाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्याची आवश्यकता आहे. सिंधी विद्यापिठाचे स्वप्न साकार व्हायचे असेल, तर सध्याच्या मोदी सरकारवर दबाव आणावा लागेल.

अखंड भारत हे प्रत्येकाचे स्वप्न ! – जगद्गुरु शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती

जगद्गुरु शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती म्हणाले, ‘‘अखंड भारत हे देशातील प्रत्येकाचे स्वप्न आहे. हे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात निश्चितच सत्यात उतरेल.’’