भंडारा येथे उपविभागीय अधिकाऱ्यांवर आक्रमण करणाऱ्या आरोपीसमवेत जेवणारे ३ पोलीस कर्मचारी निलंबित !

प्रतिकात्मक छायाचित्र

भंडारा – दोन दिवसांपूर्वी येथील उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर २० ते २५ वाळू माफियांनी प्राणघातक आक्रमण केले होते. यामध्ये राठोड घायाळ झाले होते, तसेच त्यांच्या वाहनांच्या काचाही फोडल्या होत्या. याप्रकरणी पवनी पोलिसांनी पसार झालेल्या तिघांना अटक केली आहे, तर त्यातील एका आरोपीसमवेत पोलिसांनी मटणावर ताव मारल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला. त्यानंतर पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी पोलीस हवालदार दिलीप धावडे, पोलीस शिपाई खुशांत कोचे आणि राजेंद्र लांबट यांना निलंबित केले.

राजेश मेंगरे, धर्मा नखाते आणि राहुल काटेखाय अशी आक्रमणकर्त्यांची नावे आहेत. राठोड यांच्यावरील आक्रमणाची घटना महत्त्वाची असतांना पोलीस हवालदार  दिलीप धावडे हे हा विषय किरकोळ असल्याचे सांगत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे.

संपादकीय भूमिका

  • वाळू माफियासमवेत जेवतांना पोलिसांना काहीच कसे वाटत नाही ? गुन्हेगारांसमवेत पोलिसांचेच ‘जिव्हाळ्या’चे संबंध असतील, तर असे पोलीस वाळू माफियांवर कठोर कारवाई करतील का ? सरकारने अशा पोलिसांना निलंबित करण्याऐवजी बडतर्फ करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !