खासदार नवनीत राणा यांचे आतंकवादी दाऊदशी संबंध असलेल्या युसूफ लकडावाला याच्याशी आर्थिक संबंध !

खासदार संजय राऊत यांचा आरोप

मुंबई – खासदार नवनीत राणा यांनी कुख्यात आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असलेल्या युसूफ लकडावाला याच्याकडून ८० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. युसूफ लकडावाला हा दाऊदचा आर्थिक स्रोत असल्याचे मानले जाते. आर्थिक अपहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने त्याला अटक केली होती. आर्थररोड कारागृहात कर्करोगामुळे त्याचा मृत्यू झाला.

प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना संजय राऊत म्हणाले, ‘‘दाऊद आणि राणा दांपत्य यांचे आर्थिक संबंध कसे आहेत, याचे हे छोटे उदाहरण आहे. याचे अन्वेषण अंमलबजावणी संचालनालयाकडून का झाले नाही ? युसूफ लकडावाला याने आर्थिक अपहाराचा पैसा अनेक ठिकाणी फिरवला. त्यातील एक लाभार्थी म्हणजे राणा दांपत्य आहे. त्यांनी हे पैसे का आणि कशासाठी घेतले ? हा अन्वेषणाचा भाग आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराकडून घेतलेल्या पैशांचा वापर कुठे केला ? यामध्ये आणखी काही व्यवहार आहेत का ? याचे अन्वेषण मुंबईच्या आर्थिक शाखेने का केले नाही ? नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई केली, तर राणा दांपत्य यातून कसे सुटू शकते ? माझा अंमलबजावणी संचालनालयाला प्रश्‍न आहे की, २०-२५ लाख रुपयांसाठी आमच्या मंत्र्यांना कारागृहात टाकता, मग २०० कोटी रुपयांच्या आर्थिक अपहाराच्या अन्वेषणासाठी लकडावाला याला कह्यात घेतले असतांना या अन्वेषणातून राणा दांपत्य कसे सुटले ?’’

राणा यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय शक्तीचा महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न !

‘याविषयी मी मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यांसह सर्व माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही माहिती योग्य ठिकाणी पाठवली आहे. या प्रकरणी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून ‘तुम्ही कुणाच्या बाजूने उभे आहात ?’, अशी विचारणा मी करणार आहे. नवनीत राणा यांच्या खात्यात जमा झालेल्या पैशांविषयी भाजपने अंमलबजावणी संचालनालयाकडून अन्वेषण करण्याची मागणी केली पाहिजे. राणा यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय शक्ती महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करू इच्छित आहेत’, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला असून याविषयी अन्वेषण करण्याची त्यांनी मागणी केली आहे.