अब्जाधीश इलॉन मस्क यांनी अंतत: विकत घेतले ट्विटर !

४४ अब्ज डॉलर्समध्ये झाला व्यवहार !

वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘टेस्ला’ आस्थापनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अब्जाधीश इलॉन मस्क हे ट्विटरचे नवे मालक बनले आहेत. ४४ अब्ज डॉलर्स म्हणजेच ३ लाख ३६ सहस्र कोटी रुपयांत खरेदी करार झाला. मस्क यांना ट्विटरच्या प्रत्येक ‘शेअर’साठी (समभागासाठी) ५४.२० डॉलर (४ सहस्र १४८ रुपये) द्यावे लागतील. ट्विटरमध्ये मस्क यांची आधीपासून ९ टक्के भागीदारी आहे. ते ट्विटरचे सर्वांत मोठे ‘शेअर होल्डर’ (समभाग धारक) आहेत. आता झालेल्या करारानंतर मस्क यांची आस्थापनामध्ये १०० टक्के भागीदारी असेल आणि ट्विटर त्यांचे खासगी आस्थापन होईल.

‘सी.एन्.एन्.’च्या वृत्तानुसार ट्विटर इलॉन मस्क यांच्या मालकीचे आस्थापन बनल्यानंतर ट्विटरच्या सर्व समभाग धारकांना प्रत्येक समभागासाठी ५४.२० डॉलर्स रोख मिळतील.

ट्विटरवरील भाषणस्वातंत्र्य अबाधित राहील, अशी आशा !

खरेदी करार अंतिम झाल्यानंतर मस्क यांनी ‘भाषण स्वातंत्र्या’चे समर्थन करणारे ट्वीट केले. लोकांचे भाषणस्वातंत्र्य अबाधित रहावे, हा ट्विटर विकत घेण्यामागील उद्देश होता, असे त्यांनी नमूद केले.

ट्विटरचा जागतिक प्रभाव !

ट्विटरचे जगभरात २१.७ कोटी सक्रीय वापरकर्ते आहेत. यांपैकी सर्वाधिक ७.७ कोटी अमेरिकेत आहेत. दुसर्‍या क्रमांकावर जापान आहे, जिथे ५.८ कोटी लोक ट्विटर वापरतात. त्याच वेळी २.४ कोटी वापरकर्त्यांसह भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे.