येत्या २७ वर्षांत पृथ्वीवरील अन्नधान्य नष्ट होणार ! – शास्त्रज्ञांची चेतावणी

मुंबई –  आगामी २७ वर्षांमध्ये जगातले सगळे अन्नधान्य संपणार आहे, अशी चेतावणी शास्त्रज्ञांनी दिली आहे.

१. २४ एप्रिल २०२२ पासून वैज्ञानिकांनी सजीवसृष्टीच्या मृत्यूच्या दिवसाची मोजणी चालू केली आहे. पृथ्वीवासियांकडे आता केवळ २७ वर्षं आणि २५१ दिवस शिल्लक राहिले आहेत, असा वैज्ञानिकांनी दावा केला आहे.


२. शास्त्रज्ञ एडवर्ड विल्सन यांनी सांगितले की, मानवाची अन्नाची मागणी पूर्ण करायची असेल, तर आपल्याला आणखी २ पृथ्वींची आवश्यकता भासणार आहे. पृथ्वीवर अन्नधान्य पिकवण्याला एक मर्यादा आहे. जगातला प्रत्येक माणूस शाकाहारी बनला, तरी माणसाच्या गरजा भागवण्यासाठी जगातले शेतकरी आणि त्यांच्या भूमी इतक्या मोठ्या प्रमाणात धान्यनिर्मिती करू शकणार नाहीत. पुढच्या काळात जगभरातील लोकसंख्या प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाची खाण्याची मागणी पूर्ण केली जाऊ शकणार नाही. पुढच्या २७ वर्षांमध्ये जगाची लोकसंख्या १० बिलियन म्हणजेच १ सहस्र कोटींवर पोचणार आहे. अन्नधान्याच्या मागणीविषयी सांगायचे झाल्यास ही संख्या वर्ष २०१७ च्या तुलनेत ७० टक्के वाढण्याची शक्यता आहे.

३. तज्ञांनी वाढती लोकसंख्या आणि अन्नधान्य उत्पादनांच्या आकडेवारीवरून निष्कर्ष काढला आहे. त्यानुसार गेल्या ८ सहस्र वर्षांमध्ये मानवाने कधीच केले नसेल, इतक्या धान्याचे उत्पादन येणार्‍या ४० वर्षांत मानवाला करावे लागणार आहे. पृथ्वी १ सहस्र कोटी नागरिकांना अन्न खाऊ घालू शकेल; परंतु त्यानंतर पृथ्वीवरचा भार वाढायला प्रारंभ होणार आहे. माणसे आवश्यकतेपेक्षाही अधिक अन्न खात आहेत आणि नंतर अन्नाची नासाडीही करत आहेत. त्यामुळे धान्यनिर्मिती करण्यासाठी पृथ्वीवर दबाव वाढत जाणार आहे. पृथ्वीवरचे सर्व नागरिक शाकाहारी झाले, तरच अधिक लोकसंख्येला अन्न खाऊ घालता येणार आहे. उदाहरणार्थ, मक्याच्या तुलनेत मांसाचे उत्पादन करण्यास ७५ हून अधिक पट ऊर्जेचा वापर केला जातो. वर्ष २०५० पर्यंत जगातल्या सर्व देशांमध्ये अन्नधान्याची कमतरता भासणार आहे.