मुंबई, २४ एप्रिल (वार्ता.) – अमरावती येथील अपक्ष आमदार रवि राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा अन् शिवसेना यांच्यात चालू असलेल्या वादामधील निरर्थक गोष्टींचे जवळजवळ बहुतांश प्रमुख वृत्तवाहिन्यांवरून मागील ३ दिवसांपासून घंटोंन्घंटे थेट प्रक्षेपण केले. ‘मातोश्री’च्या समोर हनुमान चालिसा म्हणणार असल्याची घोषणा केल्यासाठी राणा दांपत्याला विरोध करण्यासाठी ‘मातोश्री’च्या बाहेर जमलेल्या शिवसैनिकांना वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींकडून ‘वाद अधिक चिघळेल’ अशा प्रकारचे प्रश्न विचारून त्यांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या.
वृत्तवाहिन्यांकडून दिवसभर तीच तीच दृश्ये दाखवण्यात येत होती. राणा दांपत्य यांचे या अमरावती येथून मुंबईत येणे, ‘मातोश्री’बाहेर जमलेल्या शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया, राणा यांच्या निवासस्थानाबाहेरील पोलिसांचा पहारा आदी सर्व घटनाक्रमाची मालिकाच वृत्तवाहिन्यांवरून दिवसभर चालवण्यात आली. जनतेच्या विविध समस्या, सरकारचा कारभार, भ्रष्टाचाराच्या घटना, महिलांवरील अत्याचार आदी विविध समस्या राज्यापुढे असतांना राजकीय घडोमोडींचे प्रक्षेपण वृत्तवाहिन्यांवरून दिवसभर दाखवण्यात येत असल्याविषयी विविध समाजघटकांतून खेद व्यक्त करण्यात येत आहे.
… तर समाजाला चूक दाखवण्याचा अधिकार पत्रकारांना उरतो का ? – डॉ. सच्चितानंद शेवडे, आंतरराष्ट्रीय व्याख्याते आणि प्रवचनकार
‘पत्रकारितेतून समाजापुढे नेमका कोणता संदेश जात आहे ?’, याचा विचारच करायचा नसेल, तर ‘समाजात घडत असलेले चुकीचे आहे’, असे म्हणण्याचा अधिकार पत्रकारांना उरतो का ? त्याला एकापरिने पत्रकारही उत्तरदायी ठरतात. बातम्यांना चाप लावला तर ‘पत्रकारितेची गळचेपी’ म्हणून विरोध होतो; परंतु भडक बातम्या दिल्या जातात त्याचे काय ? ‘कोण काय म्हणाले ?’ यावर अन्यांची प्रतिक्रिया घेतांना त्याविषयी पत्रकारांचा अभ्यास असायला हवा. शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना ऐन दिवाळीत अटक केल्यानंतर २-३ दिवस त्यांचा एकेरी उल्लेख करून ‘स्टोरी’ चालवल्या गेल्या; मात्र त्यांनी निर्दोष सुटका झाल्यावर यांतील कितीजणांनी क्षमायाचना केली ? शंकराचार्य निर्दोष असल्याची बातमी प्रसारित केली ? यातून ‘पत्रकारिता नेमकी कोणत्या दिशेने जात आहे ?’, असा प्रश्न मनात निर्माण होतो.
लोकांनी वृत्तवाहिन्या बंद करणे हाच एकमेव पर्याय ! – प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक आणि अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक
‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावाखाली एकच वृत्त वारंवार दाखवले जाते. लोकांनी टी.व्ही बंद करणे, हाच त्यावर उपाय आहे. त्यामुळे मी आता ‘दूरदर्शन’ वाहिनीच पहातो.
अशा बातम्यांमुळे समाजातील प्रत्येक माणूस वैतागला आहे ! – विजय भोसले, ज्येष्ठ पत्रकार, दैनिक केसरी, पुणे
पत्रकारिता वेगळ्या दिशेने चालली आहे. देशात बेकारी, महागाई आदी अनेक प्रश्न असतांना त्यांकडे दुर्लक्ष करून निरर्थक गोष्टी दाखवल्या जात आहेत. सध्या कुठलीही वृत्तवाहिनी चालू केली की, ‘आरोप-प्रत्यारोपांवर शिवसेनेचे नेते काय म्हणाले ?’ ‘भाजप-काँग्रेसवाले काय म्हणाले ?’ हेच सातत्याने दाखवले जाते. देशातील सर्व प्रश्न संपले आहेत का ? सातत्याने अशी वृत्ते दाखवल्यामुळे जनतेमध्ये वृत्तवाहिन्यांविषयी तिरस्कार निर्माण झाला आहे. अशा वृत्तांना जनता आता वैतागली आहे.
संपादकीय भूमिका
भारतात हिंदूंवर होणारे अत्याचार, तसेच धर्मांधांचा उद्दामपणा वाढत आहे. देशावर अनेक संकटे ओढवली असतांना निरर्थक गोष्टींचे भांडवल करून त्याचे घंटोन्घंटे प्रसारण करणे, हे वृत्तवाहिन्या भरकटल्या असल्याचे द्योतक आहे. अशी पत्रकारिता लोकांना दिशादर्शन काय करणार ?