‘शत्रूराष्ट्रांच्या युद्धसज्जतेपुढे भारताची युद्धसज्जता खरोखरच सक्षम आणि वरचढ आहे का ? शत्रूचा सामना करतांना स्वतः वरचढ ठरण्यासाठी मुत्सद्देगिरीच हवी; पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आजच्या शासनकर्त्यांमध्ये ती दिसून येत नाही. पाक आणि चीन तर युद्धाची ठिणगी पडण्याची वाटच पहात आहेत अन् भारत विकासाच्या मागे धावण्यातच मग्न राहून एकप्रकारे राष्ट्रघातच करत आहे. हे उद्वेगजनकच आहे. आता लोकसभा निवडणुकीचा काळ जवळ आला आहे. निवडणूक आणि विकास दोन्ही गोष्टी राष्ट्रासाठी महत्त्वाच्या आहेतच; परंतु देशाच्या सीमांची नाजूक स्थिती पहाता संरक्षणक्षेत्रात भारताने स्वतःचा दबदबा निर्माण करणे, सुरक्षेला प्राधान्य देणे, हे सध्याच्या स्थितीला अग्रक्रमाचे आहे. शत्रूला आपली युद्धसज्जता पाहून घाम फुटायला हवा. ठाऊक असलेली शस्त्रे, अस्त्रे नव्हेत, तर त्याहून भीषणतर नवनवीन शस्त्रास्त्रे शोधून काढण्यासाठी आणि घडवण्यासाठी शतावधी रणरसायनशाळा खटपटत राहिल्या पाहिजेत. सहस्रावधी शस्त्रास्त्रांचे कारखाने साऱ्या देशभर खणखणत राहिले पाहिजेत.
भारताला संरक्षणमंत्री नको, तर आक्रमणमंत्री हवेत ! आज भारताच्या चहूबाजूला असलेल्या शत्रूराष्ट्रांच्या कारवाया पहाता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे महत्त्व आपल्या लक्षात येते. राष्ट्रप्रेम, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि निष्णात अशी युद्धसज्जता असल्यासच संपूर्ण जगात भारत हे बलवान राष्ट्र म्हणून उदयास येईल, हे शासनकर्त्यांनी लक्षात घ्यावे.
(दैनिक ‘सनातन प्रभात’, वर्ष २०१९)
संपादकीय भूमिकाहे द्रष्ट्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्राने युद्धसज्ज रहाण्याचे विचार आजही उपयोगी ! |