अमरावती येथे राणा दांपत्याच्या निवासस्थानासमोर बांगड्या फेकून शिवसेनेचे निषेध आंदोलन !

अमरावती – येथील अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुंबई येथील शिवसेनेच्या ‘मातोश्री’समोर जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याची चेतावणी दिली होती. १७ एप्रिल या दिवशी शिवसैनिकांनी रवि राणा यांच्या निवासस्थानासमोर निषेध आंदोलन केले. या वेळी ५०० शिवसैनिकांची उपस्थिती होती. यामध्ये ३०० हून अधिक महिला कार्यकर्त्या होत्या. शिवसेनेच्या अमरावती जिल्ह्याच्या महिला जिल्हाप्रमुख वर्षा भोयर यांच्या नेतृत्वात महिलांनी राणा दांपत्याच्या निवासस्थानासमोर बांगड्या फेकून त्यांच्या घोेषणेचा निषेध केला. या वेळी कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे हाती घेतले होते. काही कार्यकर्त्यांनी हनुमानाची वेशभूषा धारण केली होती.

शिवसैनिकांना रोखण्यासाठी राणा यांचे समर्थक त्यांच्यासमोर उभे होते. राणा समर्थकांनी घरासमोर हनुमान चालिसा पठण केले, तसेच ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. पोलिसांनी शिवसैनिकांना कह्यात घेतल्यामुळे आंदोलन शांत झाले.

पत्रकारांशी बोलतांना अपक्ष खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, हिंदुत्वाची बाळासाहेबांची विचारधारा ही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पार पाडत आहेत. त्यामुळे ते लवकरच उद्धव ठाकरे यांची जागा घेतील. ‘मातोश्री’समोर जाऊन हनुमान चालिसा म्हणू.