‘साधकांकडून दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा साधना म्हणून होण्यासाठी ‘सनातन प्रभात’चे संस्थापक-संपादक परात्पर गुरु डॉ. आठवले हे गेली २३ वर्षे अव्याहतपणे मार्गदर्शन करत आहेत. हे मार्गदर्शन करतांना ते साधकांना ‘सनातन प्रभात’मधील व्याकरणाच्या आणि लिखाणातील संकलनाच्या अनेक चुका लक्षात आणून देत आहेत; मात्र तरीही दैनिकातील साधकांकडून साधनेच्या स्तरावर अपेक्षित असे प्रयत्न न झाल्यामुळे परात्पर गुरुदेवांनी मे २०२१ पासून आणखी तीव्रतेने आमच्याकडून प्रयत्न करवून घेतले. त्यामुळे आम्हा साधकांमधील अंतर्मुखता वाढून आमच्यात तळमळीने साधना करण्याची जाणीव निर्माण झाली.
१. परात्पर गुरुदेवांनी दैनिकात अनेक चुका निदर्शनास आणून दिल्यावर आरंभी मनावर ताण येणे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या मार्गदर्शनानंतर मनावरचा ताणन्यून होऊन शिकण्याच्या स्थितीत रहाता येणे
मे २०२१ पासून परात्पर गुरुदेवांनी दैनिकातील शुद्धलेखन, व्याकरण आणि संरचना यांच्या छोट्या छोट्या चुकांपासून मध्यम अन् मोठ्या स्वरूपाच्या अनेक चुका दाखवून दिल्या. त्यामुळे आमची अंतर्मुखता वाढली. ‘चूक छोटी असो वा मोठी, प्रत्येक चूक आपल्याला ईश्वरापासून दूर नेते’, याची तीव्रतेने जाणीव परात्पर गुरुदेवांच्या कृपेने झाली. ‘ज्या चुका परात्पर गुरुदेवांच्या लक्षात येतात, त्या माझ्या लक्षात का येत नाहीत ?’ या विचाराने आरंभी मनावर थोडा ताण होता. त्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘दैनिकात चुका होऊ नयेत; म्हणून साधकांनी कसे प्रयत्न करायला हवेत ? ताण न घेता शिकण्याच्या स्थितीत कसे रहायला हवे ?’, याविषयी सत्संग घेऊन मार्गदर्शन केले. त्यामुळे मनावरचा ताण न्यून होऊन शिकण्याच्या स्थितीत रहाता आले. त्यानंतर शुद्धलेखन अन् व्याकरण यांचा अभ्यास वाढण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रयत्न होऊ लागले. या प्रयत्नांमुळे मनाची एकाग्रताही वाढण्यास साहाय्य झाले.
२. ‘सनातन प्रभात’ची सेवा परिपूर्ण होण्यासाठी व्यष्टी साधनेचेही प्रयत्न तळमळीने झाले पाहिजेत, याची जाणीव परात्पर गुरुदेवांनी करून दिल्यावर प्रयत्नांत वाढ होणे
‘आमच्याकडून गतीने आणि तळमळीने प्रयत्न होण्यासाठी परात्पर गुरुदेव स्वतः दिवसातील ३ – ४ घंटे दैनिकाचे वाचन करून आम्हाला दिशा आहेत; मात्र आम्ही परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करण्यात पुष्कळ अल्प पडतो’, याची जाणीव तीव्रतेने झाली. ही सेवा परात्पर गुरुदेवांना अपेक्षित अशी होण्यासाठी केवळ कृतीच्या (कार्याच्या) स्तरावर प्रयत्न अपेक्षित नाहीत, तर ‘व्यष्टी साधनेचेही’ प्रयत्न तेवढ्याच तळमळीने झाले पाहिजेत, याचीही जाणीव परात्पर गुरुदेवांनी करून दिली. त्यानंतर व्यष्टी साधनेच्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाविषयीचे सारणी लिखाण करणे, स्वयंसूचनांची सत्रे करणे, प्रार्थना अन् कृतज्ञता अधिकाधिक करणे, नामजपादि उपाय करणे, आदी प्रयत्नही परात्पर गुरुदेवांच्याच कृपेने नियमित आणि पूर्वीपेक्षा अधिक परिणामकारक होऊ लागले. त्यामुळे मन सकारात्मक होऊन आनंदही अधिक मिळायला लागला.
३. ‘सनातन प्रभात’च्या सेवेच्या माध्यमातून आंतरिक साधना वाढवून गुरुचरणी समर्पित होण्यासाठी गुरुदेवांनी अमूल्य संधी देणे
गेल्या जवळपास १० मासांहून अधिक काळ परात्पर गुरुदेव ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या आम्हा सर्व साधकांकडून साधनेचे प्रयत्न करवून घेत आहेत. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने आणि साधकांच्या संघटित प्रयत्नांमुळे ‘सनातन प्रभात’मधील चुकांचे प्रमाण आधीपेक्षा न्यून झाले आहेत. त्यामुळे ‘सनातन प्रभात’मधील चैतन्यामध्येही वाढ झाली आहे. आता गुरुदेवांना आम्हा साधकांचे साधनेचे प्रयत्न आणखी वाढणे अपेक्षित आहे. ‘सनातन प्रभात’च्या सेवेच्या माध्यमातून आंतरिक साधना वाढवून गुरुचरणी समर्पित होण्यासाठी गुरुदेवांनी आम्हा सर्व साधकांना अमूल्य संधी दिली आहे. या संधीचा आम्हाला अधिकाधिक लाभ करून घेता येऊ दे, हीच त्यांच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना !
४. साधकांकडून प्रयत्न होऊ लागल्यावर त्यांचे कौतुक करणारे आणि साधनेत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारे परात्पर गुरुदेव !
‘सनातन प्रभात’ची सेवा चुकांविरहित आणि परिपूर्ण होण्यासाठी परात्पर गुरुदेवांनी आम्हा साधकांना तीव्रतेने जाणीव करून दिली. त्यामुळे साधकांमध्ये परिपूर्ण सेवा करण्याची तळमळ निर्माण झाली आणि तसे प्रयत्नही चालू झाले. साधकांचे प्रयत्न वाढल्यामुळे परात्पर गुरुदेवांनाही आनंद झाला आणि ते कौतुकाने म्हणाले, ‘‘आता ‘सनातन प्रभात’मधील चुका कमी झाल्या आहेत. त्यामुळे दैनिकातील चैतन्यही वाढले आहे.’’ खरेतर परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच हे सर्व साध्य झाले. आम्हा साधकांची साधना वाढण्यासाठी आणि आम्हाला घडवण्यासाठी परात्पर गुरुदेव अन् श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी त्यांचा अमूल्य वेळ दिला. यासाठी आम्ही सर्व साधक त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहोत.
‘परात्पर गुरुदेव, ‘सनातन प्रभात’रूपी अमूल्य समष्टी सेवा परिपूर्ण आणि भावपूर्ण होण्यासाठी तुम्ही केलेल्या मार्गदर्शनानुसार आमच्याकडून सातत्याने, चिकाटीने अन् तळमळीने प्रयत्न होऊ देत अन् आम्हा साधकांची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होऊदे, अशी तुमच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना आहे.’
– सौ. समीक्षा गाडे, उपसंपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह (१५.४.२०२२)
कोटीशः कृतज्ञता !
‘दैनिकातील चुका दाखवून परात्पर गुरूदेवांनी आम्हाला त्यावर कठोर प्रयत्न करायला सांगितले, ही त्यांनी आमच्यावर केलेली अगाध कृपा आहे. आधी सेवा करतांना आमच्याकडून ती पाट्याटाकूपणे केली जात होती किंवा जेवढे सांगितले, शिकवले तेवढेच केले जात होते. गुरुदेवांनी ‘त्यापुढे जाऊन सेवा कशी करायची ?’ हे शिकवून संकुचित न रहाता व्यापक बनण्याची दृष्टी दिली, त्या दृष्टीसाठी कृतज्ञता गुरुदेव !
आधी आमच्याकडून सेवा एकाग्रतेने होत नव्हती. त्यामुळे आमच्याकडून कळत-नकळत अनेक चुका व्हायच्या, पण आता त्या चुकांमुळे ‘आमच्या साधनेची हानी होत आहे’ आणि ‘आम्हाला त्याचे पातक लागते’, ही जाणीव गुरुदेवांनी अंतर्मनावर कोरल्यामुळे आता आमच्याकडून सतर्क राहून सेवा केली जाते अन् सेवा पडताळलीही जाते. आमच्या जीवनाचा उद्धार व्हावा, ही तळमळ गुरुदेवांनाच अधिक आहे. आमच्यावर कृपेची उधळण करणार्या हे गुरुदेवा, तुमच्या चरणी कृतज्ञता !
आम्ही परिपूर्ण सेवा करण्यासाठी गुरुमाऊलीनेच कष्ट घेतले आहेत. त्यासाठीच शब्दच अपुरे आहेत. गुरुदेवा, सर्व तुम्हीच करता आणि कौतुक मात्र आमचे ! पण देवा, यात आमचे कौतुक करण्यासारखे काहीच नाही. तुम्हीच सर्व केले, कारण आम्हाला तर आम्ही चुकत आहोत, हेही कळत नव्हते. तुम्ही मार्गदर्शन केले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी आमच्या अंतर्मनातील प्रक्रिया कशी चुकते ? हे सांगितले. दोन्ही गुरूंनी आमचे बोट पकडून आम्हाला इथपर्यंत आणले. यासाठी कोटीशः कृतज्ञता ! कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. वेदश्री खानविलकर, फोंडा (१६.४.२०२२)