पुणे शहर परिसरातील मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवण्यासाठी मनसेकडून पुणे पोलिसांना ४ दिवसांचे ‘अल्टीमेटम’

पुणे – येथील डेक्कन, विश्रामबाग आणि फरासखाना परिसरातील मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवावे, यासाठी मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी पुणे पोलिसांना पत्र दिले आहे. हे भोंगे हटवण्यासाठी मनसेकडून पुणे पोलिसांना ४ दिवसांचे ‘अल्टीमेटम’ (समयमर्यादा) देण्यात आले आहे. ‘४ दिवसांत मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढा, अन्यथा दुप्पट पटीने ध्वनीक्षेपक लावून हनुमान चालिसाचे पठण करणार’, अशी चेतावणी या पत्राच्या माध्यमातून देण्यात आली आहे. पुण्यातील डेक्कन पोलीस ठाणे, विश्रामबाग, फरासखाना पोलीस ठाण्याला हेमंत संभूस यांनी हे पत्र दिले आहे.

पत्रात नमूद केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमानुसार सर्व मशिदींवरील भोंगे अनधिकृत ठरवले गेले आहेत. आमच्या पक्षाची कोणाच्याही धार्मिक भावना दुखावायची इच्छा नाही अथवा प्रार्थनेला विरोध नाही. तरी अनधिकृत भोग्यांमुळे सर्वसामान्य नागरिक, वृद्ध आणि विद्यार्थी यांना होणारा त्रास मनसे खपवून घेणार नाही. अनधिकृत भोंगे बंद करायचे सर्वस्वी दायित्व सरकार आणि पोलीस प्रशासन यांचे आहे. असे न झाल्यास येत्या ४ दिवसांत सर्व मशिदींसमोर दुप्पट पटीने ध्वनीक्षेपक लावून हनुमान चालिसाचे पठण केले जाईल.