सरकारी कर्मचारी इरफान शेखचा जामीनअर्ज अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळला !

१ सहस्र लोकांना इस्लाममध्ये धर्मांतरित केल्याचे प्रकरण

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – १ सहस्र लोकांना इस्लाममध्ये धर्मांतरित करून भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप असलेल्या इरफान शेख या केंद्र सरकारच्या कर्मचार्‍याचा जामीनअर्ज अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकताच फेटाळून लावला. न्यायमूर्ती रमेश सिन्हा आणि न्यायमूर्ती बृजराज सिंह यांच्या खंडपिठाने लक्ष्मणपुरीच्या आतंकवादविरोधी पथकाच्या (‘ए.टी.एस्.’च्या) विशेष न्यायाधिशांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये दिलेला आदेश ग्राह्य ठरवतांना शेख याला जामीन देण्यास नकार दिला.

आरोपी इरफान शेख आणि सहआरोपी उमर गौतम यांनी काही देशद्रोही घटक आणि आय.एस्.आय. या पाकच्या गुप्तचर संघटनेच्या इशार्‍यावर विदेशातून निधी मिळवून लोकांना इस्लाममध्ये धर्मांतरित करून भारताविरुद्ध युद्ध पुकारल्याचे भक्कम पुरावे अन्वेषण करणार्‍या अधिकार्‍यांना सापडले होते. आरोपींनी एक टोळी सिद्ध करून अनुमाने १ सहस्र लोकांचे धर्मांतर केले होते.

‘सांकेतिक भाषा प्रशिक्षण आणि संशोधन केंद्रा’त कार्यरत होता इरफान शेख !

आरोपी इरफान शेख ‘सांकेतिक भाषा प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र, नवी देहली’ येथे दुभाषी म्हणून कार्यरत होता. शेख याने आपल्या पदाचा गैरवापर करून मूकबधिर लोकांचे धर्मांतर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे चौकशीत सिद्ध झाले आहे.