मशिदींवर भोंगे लावले, तर मंदिरावर दुप्पट आवाजात ‘हनुमान चालीसा’ लावा ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मुंबई – कोणत्या धर्मात लिहिले आहे की, मशिदींवर भोंगे लावा ? जेव्हा धर्म लिहिला गेला, तेव्हा भोंगे होते का ? युरोपमध्ये ध्वनीवर्धक कुठे आहेत ? तुमच्या परमेश्वराला प्रार्थना करा; पण घरात राहून. प्रत्येकाने धर्म घरात ठेवला पाहिजे. सरकारला मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. ज्या मशिदींवर भोंगे लागतील, तेथील मंदिरांवर दुप्पट आवाजात हनुमान चाळीसा लावा, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे मनसेच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले.

या वेळी राज ठाकरे म्हणाले,

१. मी धर्मांध नाही, धर्माभिमानी आहे. आमचा प्रार्थनेला विरोध नाही, मशिदींवरील भोंग्यांना विरोध आहे. मशिदींवरील भोंगे खाली उतरवावेच लागतील.
२. झोपडपट्टयांमधील मदरशांवर धाडी टाकल्यास त्यांमध्ये काय काय गोष्टी आहेत, ते कळेल. त्या वेळी पाकिस्तानचीही आवश्यकता नाही. येथेच काही घडले, तर ते आवरतांना नाकी नऊ येतील.
३. अनेक मशिदी पाकिस्तानच्या प्रोत्साहनाने होत आहेत. आमदार आणि खासदार यांना केवळ मते हवी आहेत. त्यासाठी आधारकार्ड आणि शिधापत्रिका या सर्व गोष्टी त्यांना पुरवल्या जात आहेत. एक दिवस येईल, जेव्हा हिंदूंचे डोळे उघडतील.
४. भुजबळ स्वातंत्र्यसैनिक म्हणून कारागृहात गेले नव्हते. कारागृहातून आल्यावर नाकावरून टिच्चून त्यांना मंत्री करण्यात आले आणि आपण रांगेत लाचारपणे उभे राहून मतदान करायचे का ?
५. जो इतिहास विसरला, त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला आहे. वैभवशाली परंपरा असलेला महाराष्ट्र आपण कुठे आणून ठेवला आहे ?

 (सौजन्य : Hindustan Times)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीचे राजकारण चालू झाले !

जातीपातीत गुंतत राहिलो, तर हिंदुत्व कुठून रहाणार ? जेव्हा हिंदू-मुसलमान दंगल होते, तेव्हाच हिंदु समाज हिंदू असतो, अन्य वेळी तो कुणबी, मराठा, कोळी, आगरी असतो. काही लोकांना हीच गोष्ट हवी अहो. शरद पवार यांनाही असेच हवे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचे राजकारण चालू झाले. त्यापूर्वी जाती होत्या; पण त्यांमध्ये द्वेष नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसने जातीचा द्वेष चालू केला. बाबासाहेब पुरंदरे हे ब्राह्मण म्हणून त्यांना ‘सॉफ्टटार्गेट’ केले गेले. जातीपातींतून बाहेर पडलो नाही, तर आपण ‘हिंदू’ म्हणून एकत्र कधी येणार ? वैभवशाली परंपरा असलेला महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणात खितपत पडला आहे.