कोल्हापूर, ३० मार्च (वार्ता.) – मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या ‘आयर्न मॅन’ स्पर्धेत कोल्हापूर येथील सौ. माहेश्वरी झुंजार सरनोबत-शेळके यांनी सुयश मिळवले आहे. २० मार्च या दिवशी जगातील अतिशय खडतर समजली जाणारी स्पर्धा सौ. माहेश्वरी यांनी १८ व्या क्रमांकासह पूर्ण केली आहे. या यशाविषयी त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यात २ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकल चालवणे, २१ किलोमीटर धावणे या प्रकाराचा समावेश आहे. सौ. माहेश्वरी या सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार नामजप, तसेच प्रासंगिक सेवा करतात.
सौ. माहेश्वरी यांनी यापूर्वी स्पर्धेत सहभाग घेतला होता; मात्र दुखापतीमुळे त्यांना ही स्पर्धा अर्धवट सोडावी लागली होती; पण ही स्पर्धा जिंकायचीच, या उद्देशाने दळणवळण बंदीच्या काळातही त्यांनी याचा सराव चालू ठेवला होता. या स्पर्धेत यश मिळवण्यासाठी सौ. माहेश्वरी यांना त्यांचे वडील प्रसिद्ध उद्योगपती श्री. दीपक नारायण शेळके यांचे प्रोत्साहन मिळाले. या संदर्भात सौ. माहेश्वरी म्हणाल्या, ‘‘स्पर्धा कालावधीत नामजपचा लाभ झाला. ही स्पर्धा मी केवळ सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याच कृपेमुळे जिंकू शकले. ही स्पर्धा पूर्ण करतांना मी भारताचे प्रतिनिधीत्व केले, याचा मला अभिमान आहे.’’