जगात पुन्हा एकदा येऊ शकते हिमयुग ! – शास्त्रज्ञांचा दावा

हवामान पालटाचा पृथ्वीच्या संवेदनशीलतेवर पडतो प्रभाव !

कोपेनहेगन (डेन्मार्क) – हिमयुगाच्या काळात अँटार्टिका आणि ग्रीनलँड येथे शेकडो ज्वालामुखी फुटले होते. अशा ६९ भयानक ज्वालामुखींची माहिती शास्त्रज्ञांना आता संशोधनाअंती मिळाली आहे. या ज्वालामुखींच्या माहितीतून ‘हवामान पालट झाल्यास त्याचा पृथ्वीच्या संवेदनशीलतेवर कसा प्रभाव पडतो ?’, हे शास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे. यासह सध्या होत असलेला हवामान पालट आपल्याला पुन्हा हिमयुगाकडे घेऊन जाऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला आहे. ‘क्लायमेट ऑफ द पास्ट’ या जर्नलमध्ये हा अभ्यास विस्ताराने मांडला आहे. येणार्‍या काळात आपल्याला शक्तीशाली ज्वालामुखीचा स्फोट पहावा लागू शकतो, असा दावाही कोपेनहेगन विश्‍वविद्यालयातील ‘नील बोर इन्स्टिट्यूट’चे सहयोगी प्राध्यापक अँडर्स वेन्सन यांनी केला.

हिमयुग म्हणजे काय ?

हिमयुग हे पृथ्वीवरील ते कालखंड आहेत, ज्यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाचे आणि वातावरणाचे तापमान दीर्घकाळ कमी असते. यामुळे महाद्वीपांच्या मोठ्या भागात हिमनद्या पसरतात.

निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी ज्वालामुखी आवश्यक !

वैज्ञानिकांच्या एका गटाने अँटार्टिका आणि ग्रीनलँड येथील बर्फाचे जाड थर खोदून बर्फाचे खोलवर असलेले नमुने घेतले अन् त्यांचे संशोधन केले. त्यातून त्यांना ६० सहस्र वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखींच्या स्फोटांची तीव्रता आणि व्याप्ती यांची माहिती मिळाली. गेल्या २ सहस्र ५०० वर्षांत असे स्फोट न झाल्याची, तसेच निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी ज्वालामुखी आवश्यक असल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रा. अँडर्स वेन्सन यांचे म्हणणे आहे की, हे नेमकेपणाने सांगता येणार नाही की, विशालकाय ज्वालामुखी पुढील १०० अथवा पुढील काही सहस्र वर्षांत होऊ शकेल कि नाही; परंतु तो झाल्यावर पृथ्वीवर सूर्यकिरणे न पडल्याने मोठ्या प्रमाणात हवामान पालट होईल. जगात काही वर्षे हिमयुगासारखी परिस्थिती निर्माण होईल. भूकंप आणि दुष्काळ सदृश परिस्थिती ओढवेल. चहुदिशांनी हाहा:कार माजेल.

वैज्ञानिकांना अँटार्टिका आणि ग्रीनलँड येथे केलेल्या अभ्यासातून ८५ ज्वालामुखीय स्फोटांचे पुरावे मिळाले आहेत. यांपैकी ६९ ज्वालामुखी हे वर्ष १८१५ मध्ये इंडोनेशियातील माउंट तंबोरा येथे झालेल्या विशालकाय ज्वालामुखीपेक्षाही अनेक पटींनी अधिक शक्तीशाली होते. अशा ज्वालामुखींच्या वेळी पुष्कळ मोठ्या प्रमाणात ‘सल्फ्यूरिक अ‍ॅसिड’ निघाले होते, ज्यामुळे पूर्ण ‘स्ट्रॅटोस्फीयर’ (पृथ्वीच्या वातावरणातील हवेचा एक थर) झाकले गेले होते. यामुळे सूर्यकिरणे पृथ्वीवर येऊ शकली नव्हती. यामुळे अनेक वर्षे पृथ्वीवर हिवाळाच होता.

वर्ष १८१५ मध्ये झालेल्या ज्वालामुखीची व्याप्ती !

इंडोनेशियातील माउंट तंबोरा येथील ज्वालामुखीमुळे अनेक ठिकाणी त्सुनामी आणि अनेक क्षेत्रांमध्ये दुष्काळ आला होता. अनेक ठिकाणी लोक अन्न न मिळाल्याने मेले. या ज्वालामुखीमुळे एकूण ८० सहस्र लोक मृत्यूमुखी पडले होते. त्यामुळे जागतिक स्तरावर गारवा निर्माण होऊन ५ ते १० डिग्री सेल्सियस तापमान अल्प झाले होते.