आस्थापन अवैध बांधकाम करेपर्यंत कुणाच्याच लक्षात कसे आले नाही ? आस्थापनासमवेत संबंधितांनाही शिक्षा होणे अपेक्षित आहे. – संपादक
पुणे – ‘एकता हौसिंग प्रा.लि.’ या आस्थापनाने महापालिका हद्दीतील उंड्री गावामध्ये ‘एकता कॅलिफोर्निया’ नावाच्या रहिवाशी प्रकल्पास वर्ष २००७ मध्ये महापालिकेकडून अनुमती घेतली होती; मात्र आस्थापनाने प्रकल्प आराखड्यामध्ये ७ वेळा पालट करून अधिकचे बांधकाम केले. त्याकरता पर्यावरण विभागाची पूर्वअनुमती न घेता अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी सदर आस्थापनाला राष्ट्रीय हरित लवादाने अंतिम सुनावणीदरम्यान अनुमाने १५ कोटी ९९ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याविषयी पर्यावरण कार्यकर्ते तानाजी गंभीरे यांनी अधिवक्ता नितीन लोणकर आणि अधिवक्ता सोनाली सूर्यवंशी यांच्याद्वारे राष्ट्रीय हरित लवादामध्ये ऑगस्ट २०१९ मध्ये तक्रार प्रविष्ट केली होती.
हानीच्या ताळेबंद स्वरूपात मांडलेली वरील रक्कम भरपाई करून पर्यावरण पूर्ववत् करेपर्यंत बांधकाम बंद ठेवण्यासमवेतच संबंधित विभागाकडून अनुमती मिळेपर्यंत कूपनलिकेचे पाणी वापरण्यास आणि डीजी सेट वापरण्यास बंदी घालण्यात आल्याचे आदेश लवादाने दिलेले आहेत.