धुळे येथे ‘रणरागिणी युवती कार्यशाळा’ पार पडली !
धुळे, २९ मार्च (वार्ता.) – येथे मागील दोन मासांत सात दिवसांच्या शौर्य जागरण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हिंदु राष्ट्राचे विचार रुजवण्यासाठी धुळे येथील कृष्णा रिसॉर्टमध्ये एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये पुष्कळ युवती सहभागी झाल्या होत्या. यात हिंदु राष्ट्राची आवश्यकता, जीवनात साधना आणि धर्माचरण करण्याचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रथमोपचार प्रशिक्षणाची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली. शिबिरार्थी युवतींनी प्रायोगिक भागामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ‘रणरागिणी झाशीची राणी आणि जिजामाता यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून धर्मरक्षणासाठी स्वतः सिद्ध होऊन अन्य युवतींनाही प्रशिक्षित करू’, असा निर्धार युवतींनी व्यक्त केला.
‘श्रीकृष्ण रिसॉर्ट’चे मालक श्री. कल्पेश अग्रवाल, सनातन संस्थेचे श्री. दत्तात्रेय वाघुळदे, हिंदु जनजागृती समितीच्या कु. रागेश्री देशपांडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिरास आरंभ झाला. सद्गुरु नंदकुमार जाधव यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे कार्य आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय यांची माहिती देणारी ध्वनीचित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली. मन एकाग्र कसे करावे ? देवाला प्रार्थना करून अभ्यास कसा करावा ? नामजप कोणता करावा ? याविषयी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मार्गदर्शन केले. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी स्वरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता, हिंदु धर्म आणि राष्ट्र यांवर होणारे आघात,तसेच लव्ह जिहाद, देवतांचे विडंबन आदी विषयांवर मार्गदर्शन केले.
युवतींचा प्रतिसाद !
‘कार्यशाळेतून पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या असून त्यातून प्रेरणा घेऊन अन्य युवतींना जागृत करणे, धर्मकार्यात जोडणे, युवतींसाठी नवीन प्रशिक्षण वर्ग चालू करणे यांसाठी प्रयत्न करू’, असे मनोगत अनेक युवतींनी व्यक्त केले.