व्यावसायिक भ्रमणभाष मनोर्‍यांचे २६ कोटी रुपये विद्युत् शुल्क माफ करण्यात आले !

ऊर्जा विभागामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप !

मुंबई, २५ मार्च (वार्ता.) – महावितरणची अनुमती न घेता विदर्भ आणि मराठवाडा येथे व्यावसायिक हेतूने चालवल्या जाणार्‍या भ्रमणभाष मनोर्‍यांचे (मोबाईल टॉवर) २६ कोटी रुपयांचे विद्युत् शुल्क माफ करण्यात आले, असा गंभीर आरोप माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी २४ मार्च या दिवशी विधान परिषदेत केला. २६० च्या चर्चेच्या वेळी बावनकुळे यांनी हा आरोप केला.

जालना येथे ९ डिसेंबर २०२१ या दिवशी व्यवसायाचे प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या एका आस्थापनाला त्वरित १२८ कोटी रुपयांचे वीजअनुदान देण्यात आले. हे आस्थापन अनुदान देण्यासाठी नियमात बसत नसल्याची तक्रार ३० डिसेंबर या दिवशी महावितरणकडे करण्यात आली आहे. निधीचा असा अपव्यय केल्यामुळेच महावितरण डबघाईला आली आहे, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. या आरोपांविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती घेऊन लक्ष घालण्याचे आश्वासन सभागृहात दिले.