जीवनातील विविध प्रसंगांत मार्गदर्शन मिळाल्याने दैनिक ‘सनातन प्रभात’च्या दैवी शक्तीची आलेली प्रचीती !

दैनिक ‘सनातन प्रभात’मधून नेहमीच साधना, अध्यात्म, राष्ट्र-धर्मविषयीचे मार्गदर्शन मिळत असते. त्याचा व्यावहारिक आणि सामाजिक स्तरावर मला वेळोवेळी उपयोग झाला आहे. एखादी समस्या निर्माण होते, त्याच वेळी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये त्याविषयीचा एखादा लेख किंवा विचार वाचायला मिळतो, ही अनुभूतीच आहे. असे अनेकदा घडले आहे.

प्राध्यापिका डॉ. (सौ.) सायली यादव

सासूबाईंच्या आजारपणात ‘सनातन प्रभात’मधील लिखाणामुळे सेवेचा दृष्टीकोन मिळणे !

मे २०२१ मध्ये माझ्या सासूबाईंची प्रकृती अर्धांगवायूमुळे बिघडली. त्या पूर्णतः परावलंबी झाल्या. प्रारंभी त्यांचे सर्वकाही अंथरुणात करावे लागायचे. प्रथम मला ते करण्यास जड वाटत होते. साधनेचा दृष्टीकोन असूनही कृती होत नव्हती. मला ताण येत होता. त्यांची स्थिती पाहून मला वाईटही वाटत होते. त्याच वेळी बाहेर कोरोनाची स्थितीही अतिशय गंभीर होती. त्यामुळे त्यांच्या सेवेसाठी कुणाला ठेवणेही शक्य नव्हते. मी अशा तणावपूर्ण स्थितीत असतांना दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये दिवंगत सौ. सुजाता देवदत्त कुलकर्णी यांच्याविषयीचे लेख प्रसिद्ध होण्यास प्रारंभ झाला. त्यांची प्रकृती ठीक नसतांना त्यांची मुलगी आणि आश्रमातील साधक यांनी त्यांची सेवा कशी केली ? याविषयीचे लेख प्रतिदिन प्रसिद्ध होत होते. ते वाचून मला वेगळीच ऊर्जा मिळाली.

संतसेवा करत असल्याचा भाव ठेवल्यामुळे सासूबाईंची सेवा करतांना आनंद अनुभवणे

आश्रमातील साधक संतांची सेवा कशी करतात, हे मी दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये वाचायचे. ते वाचून मला माझ्या सासूबाईंची सेवा करणे मनापासून आवडू लागले. ‘मीही संतसेवाच करत आहे’, असा भाव मला ठेवता येऊ लागला. त्यांच्या सेवेतून मला आनंद मिळू लागला. गुरुदेवांच्या कृपेने मला त्यांची सेवा व्यवस्थित करता आली. गुरुदेवांनी ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून दृष्टीकोन देऊन सासूबाईंची सेवा माझ्याकडून करवून घेतली.

‘सनातन प्रभात’ मधील लिखाणामुळे आध्यात्मिक जडणघडण होणे

मी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असतांना ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील विचारांमुळे माझी आध्यात्मिक जडणघडण होत आहे’, असे मला वाटते. एखाद्या क्षेत्रात अन्यांना मार्गदर्शन करतांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर जडणघडण होणे आवश्यक असते. हा आध्यात्मिक पैलू मला ‘सनातन प्रभात’मधून नियमितपणे मिळतो. एखाद्या प्रसंगामध्ये स्थिर कसे रहायचे किंवा आध्यात्मिक दृष्टीकोन कसा असावा ? हे संतांच्या लेखांतून शिकायला मिळते.

साधक जेव्हा प्रसन्न मुद्रेने दैनिक देतात, त्या वेळी ‘गुरुदेवच आमच्या घरी आले आहेत, त्यांनी मला संदेश पाठवला आहे’, असा भाव मनाशी दाटून येतो. नकळतपणे दैनिक प्रथम मस्तकाशी आणि नंतर मग हृदयाशी कवटाळले जाते. जणूकाही गुरुदेव प्रतिदिन दैनिकाच्या माध्यमातून भेटतात ! दैनिक ‘सनातन प्रभात’मधून सर्व साधकांची उत्तरोत्तर आध्यात्मिक जडणघडण होत राहू दे’, हीच गुरुदेव आणि श्रीकृष्ण यांच्या चरणी प्रार्थना आहे.’

– प्राध्यापिका डॉ. (सौ.) सायली यादव, मुलुंड, मुंबई

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक