मुंबई, २१ मार्च (वार्ता.) – राज्यातील धान उत्पादकांसाठी आधारभूत किमतीसाठी थकित असलेले ६०० कोटी रुपये देण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २१ मार्च या दिवशी विधानसभेत सांगितले. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी धान उत्पादकांचा प्रश्न उपस्थित केला. या वेळी त्यांनी लहान शेतकर्यांना साहाय्य करण्यासाठी धानाला बोनस द्यावा, अशी मागणी केली. याला उत्तर देतांना अजित पवार म्हणाले की, धान उत्पादकांना आम्ही बोनस देणार नाही, कारण ते साहाय्य शेतकर्यांना पोचत नाही. त्यात दलाल पैसे घेतात. एकरमागे काही साहाय्य द्यायचा प्रयत्न आम्ही करू.
राज्यात भ्रमणभाषवरून ‘ई-पीक’ पहाणी नोंदवण्यासाठी शेतकर्यांना दुसर्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता ३१ मार्चपर्यंत पीक पहाणी नोंदवता येणार आहे; मात्र त्यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही. नोंदणीत अडचण असल्यास तलाठ्याशी संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.