नरसंहाराचा इतिहास !

जर्मनीचा हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर याने दुसर्‍या महायुद्धात कोट्यवधी ज्यू लोकांचा नरसंहार केला. हा इतिहास प्रत्येकाला ठाऊक आहे. जगात असे अनेक नरसंहार झाले आहेत. स्टॅलिनने रशियामध्ये, माओने चीनमध्ये आणि भारतात फाळणीच्या वेळी नरसंहार झाला आहे. हिटलर याने केलेल्या ज्यूंच्या नरसंहाराविषयी अनेक चित्रपट निघाले. त्यातील ‘शिंडलर्स लिस्ट’ हा चित्रपट अधिक गाजला होता. ज्याप्रमाणे ज्यूंच्या नरसंहाराविषयी चित्रपट निघाले, तसे वरील अन्य नरसंहारांविषयी वास्तववादी चित्रपट कुणीही काढण्याचे धाडस केले नाही, हेही एक वास्तव आहे.

काश्मीरमध्ये वर्ष १९९० मध्ये झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराविषयी आता म्हणजे ३२ वर्षांनी ‘द कश्मीर फाइल्स’ हा वास्तववादी चित्रपट काढण्यात आला आणि त्याला प्रचंड प्रतिसादही मिळू लागला आहे. त्यामुळे आता केरळमधील मोपला मुसलमानांनी केलेला हिंदूंचा नरसंहार, फाळणीच्या वेळेचा नरसंहार, गांधी यांच्या हत्येनंतर करण्यात आलेल्या ब्राह्मणांचा नरसंहार, बांगलादेशच्या वर्ष १९७१ च्या वेळचा हिंदूंचा नरसंहार, वर्ष १९८४ चा शिखांचा नरसंहार, त्यासमवेत भारतामध्ये वर्ष १९७५ मध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी या विषयावरही चित्रपट काढण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली आहे. याचाच अर्थ हाच की, जो इतिहास लोकांसमोर जसा यायला हवा होता, तसा तो आतापर्यंत आलेला नाही.

त्याला ‘द कश्मीर फाइल्स’ने वाट दाखवून दिल्याने आता या प्रकारच्या मागण्या होऊ लागल्या आहेत. इतकेच नव्हे, तर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही ‘२९ वर्षांपूर्वी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविषयी लिहिलेल्या माझ्या ‘लज्जा’ या कादंबरीवरही अद्याप कुणीही चित्रपट काढण्याचे धाडस केलेले नाही’, असे सांगत यावरही चित्रपट काढण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत अधिक वेळ सत्तेत रहाणार्‍या काँग्रेसने या नरसंहारांचे वास्तव नेहमीच दडपण्याचा प्रयत्न केला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणातही हा इतिहास येऊ दिला नाही. इतकेच काय, तर वर्ष १९६६ मध्ये साधू-संतांनी गोहत्या बंदीसाठी प.पू. करपात्री स्वामी यांच्या नेतृत्वाखाली संसदेवर मोर्चा काढला होता. त्या मोर्च्यावर गोळीबार करून शेकडो साधू-संतांना ठार केल्याची घटना लोकांना अद्यापही कळू दिलेली नाही.

(चित्रावर क्लिक करा)

यावर चित्रपट येणे आवश्यक आहे. स्वतःला अहिंसावादी म्हणवणार्‍या काँग्रेसचा हा नरसंहार जगासमोर येणे आवश्यक आहे. याच काँग्रेसने वर्ष १९७५ च्या आणीबाणीवर काढण्यात येणार्‍या ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटाचे प्रदर्शन रोखले होते. तो चित्रपट अद्यापही प्रदर्शित होऊ शकला नाही. ही अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपीच होय. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अशी परंपरा राहिली आहे की, एखाद्या विषयावरील चित्रपट अधिक प्रसिद्ध झाला, तर लागोपाठ त्याच पठडीतील चित्रपट काढण्याची स्पर्धा निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये लागते. त्यांच्यामध्ये देशातील वरील नरसंहारांविषयी चित्रपट काढण्याची चढाओढ लागली आणि त्यामुळे देशातील हिंदूंना खरा इतिहास पहायला मिळाला. त्यातून त्यांच्यात जागृती झाली, तर ती हिंदु धर्माच्या रक्षणासाठीचे मोठे यश मानावे लागेल.