विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीस राज्यपालांनी अनुमती नाकारली !

(डावीकडे) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, (उजवीकडे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नियमात पालट करण्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने निवडणुकीसाठी दिनांक निश्चित करता येत नाही, अशी भूमिका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे. तसे पत्र राज्यपालांनी विधीमंडळ सचिवालयाला १५ मार्च या दिवशी पाठवले असून या कारणास्तव ही निवडणूक पुन्हा लांबणीवर गेली आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी १६ मार्च या दिवशी निवडणूक घेण्याची महाविकास आघाडी सरकारची योजना होती. त्यानुसार राज्यपालांकडे अनुमती मागण्यात आली होती. विधानसभा नियमातील कलम ६ (१) नुसार अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा दिनांक हा राज्यपाल सरकारच्या उपदेशाने निश्चित करतात. राज्यपालांनी दिनांक निश्चित केल्याविना निवडणूक होऊ शकत नाही.