मुंबईतील गिरगाव येथे ‘मराठी भाषाभवन’ बांधणार !

मुंबई, १८ ऑक्टोबर (वार्ता.) – मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, विकास, जतन आणि संवर्धन यांसाठी मराठी भाषेविषयीची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ‘मराठी भाषाभवन’ उभारण्यात येणार आहे. गिरगाव येथील महसूल विभागाच्या ३ सहस्र ७७० चौरस मीटर भूखंडावर हे भवन उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मराठी भाषा विभागाकडून देण्यात आली.

या इमारतीमध्ये मराठी भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मराठी विश्‍वकोष निर्मिती मंडळ, मराठी परिभाषा कोश, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था आदी मराठी भाषेची संबंधित सर्व विभाग मराठी भाषाभवनामध्ये एकत्रित असणार आहेत. यासह शालेय शिक्षण विभागाची २ कार्यालये, मराठी पुस्तकांचे सुसज्य ग्रंथालय, बालोद्यान, ४०० प्रेक्षक बसण्याची क्षमता असलेले प्रेक्षागृह, या इमारतीमध्ये असेल. यासह मराठी भाषेच्या समृद्धतेचे दर्शन घडवणारी प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन दालनेही इमारतीमध्ये असणार आहेत.

मराठी पुस्तकांचे सुसज्य ग्रंथालय (प्रतिकात्मक चित्र)

या दालनांमध्ये तत्कालीन कालखंडातील ग्रंथ, महनीय ग्रंथकर्त्यांची माहिती मराठी भाषेच्या प्राचीन शिलालेखांच्या प्रतिकृती, मराठी भाषेचा विकास दर्शवणारी माहिती यांसह भाषिक रचनेनुसार महाराष्ट्राचा नकाशाही या दालनांमध्ये असणार आहे. या नकाशामध्ये स्थाननिहाय मराठी भाषा, साहित्य, साहित्यिक अशी माहिती ‘स्कॅन कोड’द्वारे पहाता येईल. भाषाभवनाच्या बांधकामासाठी शासनाकडून १५० कोटी १४ लाख रुपयांची मान्यता देण्यात आली आहे.