नागोठणे (जिल्हा रायगड), १५ मार्च (वार्ता.) – ‘अग्निहोत्र’ ही प्राचीन काळापासून वातावरणशुद्धीसाठी ऋषींनी दिलेली देणगी आहे. अग्निहोत्र कर्मबंधनमुक्त यज्ञ असल्याने ते कुणीही करू शकते. अग्निहोत्र करतांना प्रजापती आणि सूर्य यांच्या तेजाचे संरक्षककवच निर्माण होऊन सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते. आगामी महायुद्ध काळात अणूबाँबसारख्या स्फोटकातून निर्माण होणार्या घातक किरणोत्सर्गाचे विघटन करण्याची क्षमता अग्निहोत्रात आहे. नियमितपणे अग्निहोत्र केल्यास ईश्वरीय ऊर्जेचे संरक्षककवच निर्माण होते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनीष माळी यांनी आंगर आळीतील श्री हनुमान मंदिरात ‘जागतिक अग्निहोत्र दिना’निमित्त हिंदु जनजागृती मंचच्या वतीने आयोजित केलेल्या ‘अग्निहोत्र’ या विषयावरील प्रवचनात केले. तसेच अग्निहोत्राचे महत्त्व, त्याचे लाभ आणि अग्निहोत्र करण्याची प्रत्यक्ष कृती या संदर्भात तात्त्विक विवेचनासमवेतच अग्निहोत्राचे प्रात्यक्षिकही करून दाखवण्यात आले. या वेळी प्रवचनाला पुष्कळ जिज्ञासू उपस्थित होते.
प्रवचनाचे आयोजन हिंदु जनजागृती मंचचे श्री. धनंजय जाधव यांनी केले होते. हिंदु जनजागृती मंचचे श्री. चेतन कामथे यांनी उपस्थित मान्यवर डॉ. रोहिदास शेळके, तसेच राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर आणि समितीचे श्री. मनीष माळी यांचा शाल अन् श्रीफळ देऊन सत्कार केला.
क्षणचित्रे
१. ३ जिज्ञासूंनी अग्निहोत्र करण्यासाठी सिद्धता दर्शवली, तसेच सनातन संस्थेचा ‘अग्निहोत्र’ हा ग्रंथ आणि अग्निहोत्राच्या साहित्याची मागणीही केली.
२. सप्ताहात प्रत्येक शनिवारी आरतीनंतर ‘असे धर्मशिक्षण मिळावे’, अशीही मागणी केली.