|
मुंबई, १५ मार्च (वार्ता.) – मुंबई जिल्हा बँकेच्या प्रकरणात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर नोंदवलेला गुन्हा रहित करावा, यासाठी १५ मार्च या दिवशी विधान परिषदेत विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी दरेकर यांच्या अटकेच्या मागणीच्या घोषणा करत विरोधकांना प्रत्त्युत्तर दिले. या गदारोळामुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले. यामुळे तारांकित प्रश्नांचा वेळ वाया गेला, तसेच दिवसभरातील लक्षवेधी सूचना, अल्पकालीन चर्चा आदी महत्त्वाची कामेही होऊ शकली नाहीत.
सभागृहात विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभापतींच्या आसनापुढे येऊन घोषणा दिल्या. काही आमदारांनी पटले वाजवली. कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यापूर्वी उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्हे यांनी सभागृहाचे कामकाज २ वेळा ४५ मिनिटांसाठी स्थगित केले; मात्र त्यानंतरही गदारोळ न थांबल्याने सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिवसभरासाठी कामकाज स्थगित केले.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत बोगस मजूर असल्याच्या कारणावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सभागृहात तारांकित प्रश्न पुकारल्यावर भाजपचे ज्येष्ठ आमदार भाई गिरकर यांनी प्रवीण दरेकर यांच्या अटकेचे सूत्र सभागृहात उपस्थित केले. या वेळी विरोधकांकडून आमदार विनायक मेटे, प्रसाद लाड, सदाभाऊ खोत यांनी सभागृहात भूमिका मांडली. प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा नोंदवून सरकार दडपशाही करत आहे. राजकीय पक्षांचे अनेक पदाधिकारी मजूर नसतांनाही मजूर संस्थांकडून निवडून आले आहेत. त्यांच्यावरही गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी विरोधकांनी या वेळी केली.