गृहमंत्र्यांकडून स्वीकृती, तर सभापतींची मोक्का लावण्याची सूचना !
ठोस कारवाईची भूमिका न घेणारे मंत्री वाळूचा अवैध उपसा कसा रोखणार ? – संपादक
मुंबई, १४ मार्च (वार्ता.) – भंडारा जिल्ह्यातील बारव्हा येथे होत असलेल्या रेतीच्या अवैध उपशाचे व्हिडिओ विधान परिषदेत सादर करत भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी कारवाईची मागणी केली. यावर उत्तर देतांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी याची स्वीकृती देत भाजप सरकारच्या काळापासून हे अवैध उत्खनन चालू असल्याची प्रतिक्रिया दिली. या अवैध धंद्यांचे गांभीर्य ओळखून सभापती राजराजे नाईक निंबाळकर यांनी या प्रकरणी मोक्का लावण्याची सूचना मंत्र्यांना दिली.
डॉ. परिणय फुके यांनी रेतीचा अवैध उपशाचा तारांकित प्रश्न १४ मार्च या दिवशी सभागृहात उपस्थित केला. यावर बाळासाहेब थोरात यांनी उत्तर दिले. या चर्चेच्या वेळी आमदार अभिजीत वंजारी यांनी राजकीय नेते, जिल्हाधिकारी, तहसीलदार या सर्वांच्या संगनमताने रेतीचा अवैध उपसा चालू असल्याचा, तर भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी रेतीच्या अवैध उपसाच्या प्रकरणात आरोपींना सोडण्यासाठी मंत्रालयातून दूरभाष जात असल्याचा आरोप केला.
यावर उत्तर देतांना बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोरोनामुळे रेतीचा लिलाव होऊ न शकल्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. रेतीच्या अवैध उपसाप्रकरणी ७ तक्रारी आल्या आहेत. प्रत्येक तक्रारीवर कारवाई चालू आहे. हे रोखायला हवे. महसुलाचा निधी शासनाला मिळायला हवा.