‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला केला जाणारा विरोध म्हणजे हिंदूंवरील दबावतंत्रच ! – डॉ. सच्चिदानंद शेवडे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ, लेखक आणि व्याख्याते

आज ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट जगभरात प्रसारित होत आहे. त्या निमित्ताने…

हिंदुत्वनिष्ठ नेत्यांशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी साधला संवाद !

डॉ. सच्चिदानंद शेवडे

आपल्याच देशातील लोकांना आपले घरदार सोडून दुसर्‍या भागात बळजोरीने स्थायिक व्हावे लागणे, हे लज्जास्पद आहे. काश्मिरी पंडितांच्या (हिंदूंच्या) संदर्भात जे घडले, त्या वेळी कुणीही त्यांच्या साहाय्याला धावले नाही. तेव्हाचे शासनकर्ते आता विरोधी पक्षात आहेत; पण आता युक्रेनमधून भारतियांना कसे आणायचे, याविषयी ते उपदेशाचे डोस पाजत आहेत. तुम्ही तुमच्या देशातील लोकांचे रक्षण करू शकला नाहीत. आता परक्या देशातून भारतियांना आणायचे, हा शहाणपणा ते शिकवतात. याला काय म्हणावे ?

काश्मिरी पंडितांवर प्रचंड अत्याचार होऊनही एकाही पंडिताने शस्त्र उचलले नाही किंवा एकही जण अतिरेकी झाला नाही. हिंदूंच्या सहिष्णुतेचे हे मोठे उदाहरण आहे. इतक्या वर्षांनंतरही ‘हिंदु आतंकवाद’ किंवा ‘हिंदु दहशतवाद’ असे शब्दप्रयोग केले जातात; पण मुसलमानांच्या संदर्भात विषय येतो, तेव्हा आतंकवादाला धर्म नसतो ! मग हिंदूच अतिरेकी का ठरतो ? काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन करून त्यांना त्यांच्या ठिकाणी प्रस्थापित करायला हवे. त्यांची लुटली गेलेली संपत्ती त्यांना परत द्यायला हवी. त्यांना संरक्षणाची हमीही द्यायला हवी.

आतंकवाद माजलेला असतांना कुणी त्याची गोष्ट पडद्यावर सांगत असेल, तर त्याच्यावर बंदीची मागणी केली जाते, हे नेमके काय चालले आहे ? मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपटावरील बंदीची मागणी करणारी याचिका फेटाळली, हे उत्तम झाले; पण चित्रपटाच्या ‘ट्रेलर’वरून बंदीची मागणी केली जाणे, हा दबावतंत्राचा भाग आहे. अशा प्रकाराचा विविध मंचांवरून निषेध व्हायला हवा !