अभिनेत्री उपासना सिंह यांनी कथन केला किळसवाणा अनुभव
मुंबई – ‘द कपिल शर्मा शो’मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री उपासना सिंह यांनी अलीकडेच सांगितले की, चित्रपटसृष्टीत काम करत असतांना त्यांना एकदा मोठ्या दिग्दर्शकाने हॉटेलमध्ये बोलावले होते. सिद्धार्थ कानन यांच्याशी झालेल्या संवादाच्या वेळी उपासना सिंह यांनी हा किळसवाणा अनुभव कथन केला. अभिनेते अनिल कपूर यांच्या चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने दक्षिणेतील एका मोठ्या दिग्दर्शकाने रात्री उशिरा कार्यालयात बोलावल्याचेही त्यांनी सांगितले.
उपासना सिंह यांनी सांगितले, ‘चित्रपटात भूमिका देऊ केल्यानंतर मी माझी आई आणि बहीण यांच्यासोबत संबंधित दिग्दर्शकाच्या कार्यालयात जायची. अशा स्थितीत एकदा रात्री ११.३० वाजता दिग्ददर्शकाने त्यांना भ्रमणभाष केला आणि विचारले, ‘तू नेहमी तुझी आई आणि बहीण यांना का आणतेस ? आता भेटण्यासाठी रात्री हॉटेलवर ये.’ उपासना यांनी दिग्दर्शकाला सांगितले, ‘मी दुसर्या दिवशी येऊन कथा ऐकेन.’ त्या वेळी दिग्दर्शक म्हणाला, ‘‘अरे, तुला भेटण्याचा अर्थ समजला नाही का?’ यानंतर उपासना यांनी रात्रभर याचा विचार केला आणि त्या दुसर्याच दिवशी दिग्दर्शकाच्या कार्यालयात गेल्या आणि त्यांना समज देऊन परतल्या.
उपासना यांनी सांगितले की, या घटनेनंतर त्या ७ दिवस खोलीतून बाहेर पडल्या नाहीत. त्या केवळ रडत राहिल्या; कारण त्यांनी अनिल कपूरसोबत चित्रपटात दिसणार असल्याचे सर्वांना सांगितले होते. या घटनेनंतर त्या आणखी सशक्त झाल्या आणि त्यांनी ‘बॉलिवूड इंडस्ट्री’ सोडणार नसल्याचा निर्णय घेतला.
संपादकीय भूमिकाभारतीय चित्रपटसृष्टी हा वासनांध कुकृत्यांचा अड्डा बनला आहे, याचे अनेक अनुभव समोर आले आहेत. यात हस्तक्षेप करून सरकार संबंधितांवर कारवाई करणार का ? |