मोखाडा (पालघर) येथील शववाहिका चालकावर कारवाई ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

दुचाकीवरून ६ वर्षीय बालकाचा मृतदेह नेल्याचे प्रकरण

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – पालघरमधील मोखाडा तालुक्यातील पायरवाडी येथे ६ वर्षांच्या बालकाचा मृतदेह दुचाकीवरून घेऊन जावा लागला, ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेतील शववाहिकाचालक वेळेत येऊ शकला नाही, त्याच्यावर आम्ही कारवाई केली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पालघर ग्रामीण रुग्णालयातील आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आहे, असा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिला आहे. त्यामुळे रुग्णालयावर कारवाई करणे आवश्यक वाटत नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेतील लक्षवेधीमध्ये सांगितले. तेथील नगरपालिकेने शववाहिनी उपलब्ध करून देणे, हे त्यांचे कर्तव्य आहे; परंतु राज्यातील बर्‍याच नगरपालिका, परिषदा अशी व्यवस्था करत नाही, असाही खुलासा त्यांनी केला.

या वेळी आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की,

१. सरकारला ४ सहस्र कोटी रुपये कर्ज उपलब्ध झाले असून त्यातून अर्धवट, चालू असलेले किंवा मंजूर झालेल्या सर्व ग्रामीण, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालयातील बांधकामांना निधी अल्प पडू दिला जाणार नाही.

२. पालघरमधील दुर्गम भागातील आदिवासी महिलांना ‘जननी सुरक्षा योजने’तून विनामूल्य ‘सोनोग्राफी’ करून दिली जाईल. याविषयी सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता त्याला उत्तर दिले होते.

३. आमदार निधीतून शववाहिका, रुग्णवाहिका देतांना येणार्‍या क्लिष्ट नियमांमध्ये पालट करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू.

४. राज्यातील सर्वच सरकारी रुग्णालयातील ‘अ’ आणि ‘ब’ गटातील म्हणजे आधुनिक वैद्य (मेडिकल ऑफिसर) यांची रिक्त पदे भरली असून उर्वरित ‘क’ आणि ‘ड’ गटातील पदे लवकरच भरण्याचा प्रयत्न करू. जुन्या रुग्णवाहिकांचे ‘शववाहिका’मध्ये रूपांतर करण्याची चर्चा मुख्यमंत्र्यांसमवेत करून त्यासंदर्भाचा निर्णय लवकरच घोषित करू.